Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:56 PM2020-01-09T13:56:27+5:302020-01-09T14:40:48+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला धक्का; काँग्रेसची सरशी
मुंबई: राज्यातील सहा जिल्हा परिषदांचा निकाल काल जाहीर झाला. या सहापैकी केवळ एका जिल्हा परिषदेत भाजपाला बहुमत मिळालं. भाजपाला सर्वात मोठा धक्का नागपुरात बसला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जिल्हा परिषद गमावण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा नेमकी कुठे कमी पडली, याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत सरपंच अवॉर्ड कार्यक्रमात सांगितलं.
निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. या पराभवाचं आत्मचिंतन करायला हवं, असं फडणवीस म्हणाले. 'सत्तेत असताना, विरोधात असताना नागपूर जिल्हा परिषद आमच्याकडे होती. कित्येक वर्षे आमची जिल्हा परिषदेत सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत आम्हाला २१ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेचे ८ उमेदवार निवडून आले होते. तिथे आम्ही एकत्र सत्तेत होतो. मात्र यंदा आम्ही एकटे लढलो. तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवली. तिथे महाविकास आघाडी नव्हती. महाविकास आघाडीचं राजकीय गणित आमच्यासाठी नवं आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी, हे राजकीय गणित समजून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल,' असं फडणवीस यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असंही फडणवीस म्हणाले.
नागपूर जिल्हा निवडणुकीत गेल्यावेळी आम्ही एकत्र लढलो. त्यावेळी शिवसेनेच्या ८ जागा निवडून आल्या होत्या. यंदा शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा मिळाली, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली असली तरीही राज्यात भाजपाचा क्रमांक एकचा पक्ष असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. सहा जिल्हा परिषदांमध्ये मिळून भाजपाला १०३ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीमध्येही भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
नागपूर जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा?
काँग्रेस- ३०
भाजपा- १५
राष्ट्रवादी- १०
शिवसेना- १
इतर- २