Supriya Sule Exclusive : राजकारणात आल्या नसतात तर काय केलं असतं?; सुप्रियाताई मिष्किलपणे म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 07:23 PM2021-09-11T19:23:30+5:302021-09-11T19:45:54+5:30

Supriya Sule Exclusive : सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच रेवती आणि विजय या आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात येण्यात रस आहे का? किंवा त्यांनी यावं का यावर देखील भाष्य केलं आहे. 

Exclusive NCP MP Supriya Sule tells about What would you have done if you had not entered politics | Supriya Sule Exclusive : राजकारणात आल्या नसतात तर काय केलं असतं?; सुप्रियाताई मिष्किलपणे म्हणाल्या... 

Supriya Sule Exclusive : राजकारणात आल्या नसतात तर काय केलं असतं?; सुप्रियाताई मिष्किलपणे म्हणाल्या... 

Next

मुंबई - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांना 'दिल्लीच्या राजकारणात एवढ्या रमलात जर राजकारणात आला नसतात तर काय केलं असतं?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचं उत्तर दिलं आहे. "मी पॉलिसी लेव्हलला काहीतरी काम केलं असतं. कुठल्यातरी थिंक टँकमध्ये... ओआरएफ किंवा मग सुधींद्र कुलकर्णी यांची असिस्टंट म्हणून काम केलं असतं असं म्हटलं आहे. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सुळेंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच रेवती आणि विजय या आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात येण्यात रस आहे का? किंवा त्यांनी यावं का? यावर देखील भाष्य केलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी "माझी इच्छा आणि त्याचं मन या दोन गोष्टी आहेत" असं म्हटलं आहे. तसेच "आता ती टिपिकल मुंबईची मुलं असून ती खूपच जास्त व्यस्त आहेत, कॉलेज, टाईमपास, फ्रेंडसर्कल, करिअर करण्यात. माझी मुलगी इकोनॉमीस्ट असून ती लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये MA करतेय आणि मुलगा हिस्ट्रीमध्ये बॅचलर करण्यासाठी आताच लंडनला गेला आहे. त्यामुळे माझी दोन्ही मुलं आता त्यांचं इथलं शिक्षण संपवून परदेशी जात आहेत. माझी स्वत:ची इच्छा आहे की त्यांनी त्यांना जे आवडतं, ज्याच्यामध्ये त्यांना रस आहे ते त्यांनी करावं" असं म्हटलं आहे. 

"मी खासदार आहे म्हणून माझ्य़ा मुलांनी देखील खासदार व्हावं असं नाही. तर त्यांना हवं ते मुलं करू शकतात" असं देखील सुप्रिया सुळे यांनी आवर्जून म्हटलं आहे. आजच्या पिढीला मिळत असलेलं स्वातंत्र्य आणि पवार घराण्यातील शिस्त याबद्दल सुळे भरभरून बोलल्या. 'एका अतिशय मोठ्या घरात माझा जन्म झाला. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. ते विचारांनी प्रगत आहे. मात्र कपड्यांच्या बाबतीत वगैरे आम्ही तितके प्रगत नाही. मी तरुण असताना सातच्या आत घरात असा नियम होता. त्यानंतर कुठे जायचं असल्यास भावांसोबत जाऊ शकत होते. माझ्या मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू शकत होत्या. मला मात्र ती परवानगी नव्हती,' असं सुळे यांनी सांगितलं.

सातच्या आत घरात...; सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त

आम्ही अतिशय शिस्तीत वाढलो. आताच्या मुलांना आहे तितकं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं आणि तो काळदेखील वेगळा होता. मी शाळेत असताना बाबा मंत्रालयात जाताना कधीतरी मला शाळेजवळ सोडायचे. मात्र तेव्हा मी त्यांना शाळेपासून दूर असलेल्या कोपऱ्याजवळ सोडायला सांगायचे. कारण शाळेत बाबा सोडायला येतात आणि तेही गाडीनं हेच मला पटायचं नाही, आवडायचं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आताच्या काळात वडील मुलांच्या बाबतीत अतिशय सजग असतात. त्यांच्या अभ्यासावर त्यांचं लक्ष असतं. मी लहान होते, त्यावेळची परिस्थिती अतिशय वेगळी होती. आपलं मूल कोणत्या इयत्तेत शिकतंय, याचीही त्यांना माहिती नसायची. ती आघाडी आईकडे असायची. मात्र बालपणीचे ते दिवस अतिशय छान होते, असं म्हणत सुप्रिया सुळे लहानपणीच्या आठवणींत रमल्या.

Web Title: Exclusive NCP MP Supriya Sule tells about What would you have done if you had not entered politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.