एक्सक्लुझिव्ह व्हिडीयो - आरटीओने २० हजारात सोडली ओव्हरलोड वाहने
By admin | Published: June 20, 2016 02:37 PM2016-06-20T14:37:04+5:302016-06-20T14:41:30+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटीच्या (ता.पांढरकवडा) आरटीओ चेकपोस्टने २० हजार रुपये घेऊन बिनधास्त सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Next
>यवतमाळमधल्या पिंपळखुटीनं सोडली मात्र, देवरी, आदिलाबाद चेकपोस्टने अडविली
सुरेंद्र राऊत, यवतमाळ
गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि तेलंगाणामधील आदिलाबाद जिल्ह्यातल्या आरटीओ चेकपोस्टने अडविलेली ओव्हरलोड वाहने यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटीच्या (ता.पांढरकवडा) आरटीओ चेकपोस्टने २० हजार रुपये घेऊन बिनधास्त सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष असे, ट्रेलरच्या चालकाने पैसे दिल्याची बाब कबूल केली आहे.
जी.जे.२२/टी-०७६९ आणि जी.जे.०६/एव्ही-७४५५ असे या ट्रेलरचे क्रमांक आहेत. रायपूरवरून हैदराबादला हे ट्रेलर अवजड साहित्य घेऊन निघाले होते. ६ जून रोजी सर्वप्रथम देवरी (जि.गोंदिया) येथील आरटीओ चेकपोस्टवर ही दोनही वाहने अडविण्यात आली. एका ट्रेलरमध्ये सात टन, तर दुसºयामध्ये नऊ टन अतिरिक्त वजन आढळून आले. त्यामुळे या दोनही वाहनांना अनुक्रमे ३० हजार व २८ हजार ९०० एवढा दंड आकारला गेला. त्यानंतर ही वाहने नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील पिंपळखुटी (जि.यवतमाळ)च्या आरटीओ चेकपोस्टवर ९ जूनला पोहोचली. वास्तविक तेथे या वाहनांची ओव्हरलोडची तपासणी व दंड अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात तेथील अधिकाºयांनी या दोनही वाहनांच्या चालकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन ही ओव्हरलोड वाहने कोणत्याही कारवाईशिवाय ९ जूनच्या रात्री ‘पास’ करण्यात आली.
त्यानंतर ही ओव्हरलोड वाहने तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यांतर्गत येणाºया भोरट येथील आरटीओ चेकपोस्टवर पोहोचली. तेथे ही वाहने ओव्हरलोड असल्याने अडवून ठेवण्यात आली. तेथे दंड करून त्यांना सोडून देण्यात आले. देवरी व भोरट आरटीओ चेकपोस्टवर दंड झालेली वाहने पिंपळखुटी येथून कोणत्याही शासकीय दंडाशिवाय सोडली गेल्याने आरटीओचे हे चेकपोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चेकपोस्टची मासिक उलाढाल एक कोटींच्या घरात आणि त्यातील बाहेरील घटकांना वाटप ३९ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. या ओव्हरलोड ट्रेलर पासिंगमुळे यवतमाळचे डेप्यूटी आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
अजहर कुरेशी करतो ‘डील’
महाराष्ट्रातील आरटीओच्या पिंपळखुटी चेकपोस्टवर आदिलाबादमधील अजहर कुरेशी हा ‘डील’ करीत असल्याचे सांगितले जाते. त्याच्याच इशाऱ्यावरून ओव्हरलोड वाहने चेकपोस्टवरून पास होतात. उपरोक्त दोन वाहनेसुद्धा अशीच ‘पास’ झाली. विशेष असे, या चेकपोस्टवर आरटीओतील कुण्या अधिकारी, कर्मचाºयाची ड्यूटी लावायची याचेही सेटींग अजहरच करीत असल्याची माहिती आहे. पिंपळखुटी चेकपोस्ट नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.