परिवहन बसेसना डिझेल दरवाढीतून सूट द्या; NCP चं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:52 PM2022-03-21T19:52:36+5:302022-03-21T19:53:04+5:30
या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.
मुंबई – रशिया-यूक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी वाढ झाली आहे. जे बल्क कस्टमर आहेत त्यांना जादा पैसे देऊन इंधन खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे देशातील राज्य सरकारे आणि महापालिका परिवहन बसेसनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या वाढीचा भार सर्वसामान्यांवर पडण्याची शक्यता आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे. सरकारी बसेस आणि महापालिका बसेस यांना डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी अशी विनंती करणारे निवेदन मोदींना पाठवलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्रसरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत तर डिझेलचे दर १२२ रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या परिवहन सेवांचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिझेलचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या दरावर परिणाम होईल. त्यामुळे त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातून मार्ग काढावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.
याच अनुषंगाने, भारताचे पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांना निवेदनाद्वारे देशातील राज्य सरकार आणि महापालिका परिवहन बसेसना डिझेल दरवाढीतून सूट देण्याबाबत विनंती केली.@HardeepSPuri@BJP4India@BJP4Maharashtra
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) March 21, 2022
तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपावरील विक्री सलग पाचव्या महिन्यात वाढली आहे. बस ऑपरेटर आणि मॉल्ससारखे मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्ते स्वस्तात डिझेल खरेदी करण्यासाठी थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून टँकर बुक करण्याऐवजी पंपांकडून (इंधन विक्रेते) डिझेल खरेदी करत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला आहे. या तोट्याचा सामना करण्यासाठी कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा फटका नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी वितरकांना बसला आहे. तोट्यामुळे पंप बंद करण्याची कंपन्यावर आली आहे. तोट्यामुळे रिलायन्सने आपल्या विक्रेत्यांना डिझेलच्या पुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यास सांगितले आहे.
मुंबईत ९४ रुपयांचे डिझेल १२२ रुपयांना
मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसाठी मुंबईत डिझेलचा दर १२२.०५ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याच वेळी मुंबईतील पेट्रोल पंपांवर डिझेल ९४.१४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदीदारांना डिझेलसाठी प्रतिलिटर २८ रुपये अधिक मोजावे लागत आहेत