पठडीबाज पाठ्यक्रमांतून यंदापासून मुक्तता; महाविद्यालयांच्या स्वायत्तता प्रक्रियेला वेग
By रेश्मा शिवडेकर | Published: January 1, 2024 01:56 PM2024-01-01T13:56:37+5:302024-01-01T13:56:56+5:30
२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती.
मुंबई : अभ्यासक्रमांची निवड, परीक्षा पद्धती आदींबाबत उच्च शिक्षण संस्थांना स्वातंत्र्य देणाऱ्या स्वायत्तता धोरणाला आणखी वेग देण्याबरोबरच त्याचा विस्तारही केला जाणार आहे. आतापर्यंत पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांनाच स्वायत्तता बहाल करण्यात येत होती. परंतु, आगामी वर्षात पॉलिटेक्निक (पदविका) अभ्यासक्रम चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाही स्वायत्तता दिली जाणार आहे.
२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती. २०२३मध्ये हा आकडा ९७९ वर गेला असून, भविष्यात आणखी महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल केली जाणार असल्याची माहिती ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) आगामी वर्षातील योजनांचा आढावा घेताना दिली. महाराष्ट्रात २००९ साली मुंबई विद्यापीठातील एक, पुण्यातील चार, शिवाजी विद्यापीठातील दोन अशी काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी महाविद्यालये स्वायत्त होती. मात्र, आता महाराष्ट्रातील १५७ महाविद्यालये शैक्षणिक स्वायत्ततेची फळे चाखत आहेत. महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठातील सर्वाधिक ६१ महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. त्या खालोखाल पुण्यातील ३५ महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. कोल्हापूर विद्यापीठातील १७ आणि नागपूर विद्यापीठातील १५ महाविद्यालयांना स्वायत्तता मिळविण्यात यश आले आहे.
काही राज्यांतील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या
राज्य २००९ २०२३
महाराष्ट्र १४ १५७
आंध्र ५७ १४१
कर्नाटक ३२ ९५
मध्य प्रदेश ३२ ४४
ओरिसा ३२ ५०
तामिळनाडू ११९ २५२
तेलंगणा - १०५
गुजरात १ ८
शैक्षणिक स्वायत्ततेमुळे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीबाबत लवचिकता येत असल्याने आम्हाला औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रम राबविणे शक्य झाले आहे. आम्ही राबवत असलेले अनेक अभ्यासक्रम पारंपरिक विद्यापीठांत उपलब्ध नाहीत. या अभ्यासक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास मदत होते. त्यामुळे हे विद्यार्थी येत्या काळात उद्योगक्षेत्रात सामावून घेतले जातील.
- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, होमी भाभा राज्य विद्यापीठ (एचबीएसयू)
उपयोग काय?
संलग्नित विद्यापीठाने आखून दिलेल्या चौकटीतच अभ्यासक्रम, परीक्षा घ्यावी लागते. स्वायत्त संस्थांना नवे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती ठरवता येते. रोजगारक्षम असे अभ्यासक्रम या संस्थांनी राबविणे अपेक्षित आहे.