स्वातंत्र्यदिनापासून निर्बंधमुक्ती! मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार, सुरू; मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:22 AM2021-08-12T09:22:26+5:302021-08-12T09:23:44+5:30
यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. दीर्घकाळापासून कोरोना प्रतिबंधाचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. (Rajesh Tope)
मुंबई : राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आदी तूर्त बंदच राहतील. स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती मिळत असल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. (Exemption from restrictions from Independence Day! Malls, shops, hotels, bars, start-ups; Temples, places of worship, multiplexes closed)
यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. दीर्घकाळापासून कोरोना प्रतिबंधाचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येतील. सोबतच हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येतील. त्यामुळे कमी उपस्थितीत आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकतील. मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी दिली आहे.
खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यास २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारख्या इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे.
गरज लागल्यास पुन्हा लॉकडाऊन - टोपे
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आणि तिसरी लाट सुरू होताच ज्या दिवशी रुग्णांना ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्या स्थितीमध्ये लॉकडाऊन लावून पुन्हा निर्बंध लागू केले जातील. याबाबतचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले, राज्यात सध्या उद्योगांकडून १५०० ते १६०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादित केला जात आहे. दुसरीकडे, राज्यात ४५० पीएसए प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यातील १४१ प्लांट सुरू झाले आहेत. येत्या महिनाभरात आणखी २०० प्लांट कार्यान्वित होतील. सर्व पीएसए प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर राज्यात दररोज ४०० ते ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होईल.
जवळपास सारेच सुरू; व्यापाऱ्यांना दिलासा
- सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू
- हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
- दुकान, मॉल्स, हॉटेल,
रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण आवश्यक
- शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश
- मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेत जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी
- खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी २०० लोकांच्या उपस्थितीस मुभा
- खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार
- बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी
- जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
- राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार