व्यायाम प्रशिक्षकाचा पत्नीवर हल्ला
By admin | Published: October 19, 2016 02:11 AM2016-10-19T02:11:41+5:302016-10-19T02:11:41+5:30
व्यायामशाळा प्रशिक्षकाने धारदार शस्त्राने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार गोरेगावात शनिवारी सकाळी घडला.
मुंबई : व्यायामशाळा प्रशिक्षकाने धारदार शस्त्राने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार गोरेगावात शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने त्याला १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सूरज यशवंत राव (३८) असे अटक करण्यात आलेल्या व्यायामशाळा प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याची पत्नी मानसी (३६) हीदेखील व्यवसायाने व्यायामशाळा प्रशिक्षक आहे. मात्र, या दोघांचे एकमेकांशी पटत नसल्याने, मानसी ही त्यांची आठ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासह, चिंचोली बंदर परिसरात असलेल्या क्वीन सेंट इमारतीत भाडेतत्त्वावर राहते, तर सूरज बोरीवली पूर्व येथे त्याच्या पालकांसोबत राहतो.
शनिवारी सकाळी ११च्या सुमारास सूरज हा क्वीन सेंट इमारतीत आला, तेव्हा मानसी त्याला लिफ्टच्या दरवाज्याजवळ दिसली. त्या वेळी त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला; त्यादरम्यान सोबत आणलेल्या चाकूने सूरजने तिच्यावर दोन वार केले. तेव्हा मानसीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इमारतीचे सुरक्षारक्षक
राम गुप्ता (५०) तेथे पोहोचले. मानसीच्या पोटात चाकू मारून पळण्याचा तयारीत असलेल्या सूरजला त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला,
तेव्हा त्याने गुप्ता यांच्याही पोटात
चाकू भोसकला. तितक्यात, इमारतीचे इतर सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी गुप्ता व मानसीला सूरजच्या तावडीतून सोडवून, त्याला बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या दोन्ही जखमींना गोरेगावच्या कपाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवलीच्या एका व्यायामशाळेत एकत्र काम करणाऱ्या सूरज आणि मानसीचे एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर, २००६ साली त्यांनी लग्न केले आणि दोघेही वेगवेगळ्या व्यायामशाळेत काम करू लागले. त्यांना दोन मुलेदेखील झाली. मात्र त्यानंतर, सूरज हा मानसीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे हे दोघे वेगळे राहू लागले. मानसीने सूरजला मुलांना भेटण्यासही विरोध केला, ज्यामुळे सूरजने सात महिन्यांपूर्वी कोर्टात धाव घेतली. मात्र, प्रत्येक सुनावणीवेळी मानसी गैरहजर राहायची. हे पाहून सूरजच्या डोक्यात तिडीक गेल्याने, त्याने हा सगळा प्रकार केला. (प्रतिनिधी)