बहिष्कृत विवाहितेने केली आत्महत्या
By admin | Published: April 25, 2016 05:16 AM2016-04-25T05:16:52+5:302016-04-25T05:16:52+5:30
दुसरा विवाह केल्यामुळे समाजातील लोकांनी टाकलेला बहिष्कार सहन न झाल्याने एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
नांदगावपेठ /अमरावती : दुसरा विवाह केल्यामुळे समाजातील लोकांनी टाकलेला बहिष्कार सहन न झाल्याने एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्देवी घटना शनिवारी रात्री पिंपळविहीर येथे घडली. मृत्यूनंतरही बहिष्कार कायम असल्याने अखेर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मृत महिलेवर अत्यसंस्कार केले.
मोगरा येथील सरमेशा हिचा काही वर्षांपूर्वी अरुण पवारशी विवाह झाला. मात्र, दोन महिन्यांपूर्वी तिने विकास पवार याच्यासमवेत संसार थाटला. त्यामुळे पारधी समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला. घराबाहेर दिसताच समाजातील उदे्रकाला तिला सामोरे जावे लागत होते. अखेर तिने कंटाळून शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथील शिक्षक चंद्रकांत पवार व त्यांच्या सहकार्यांनी याबाबत नांदगावपेठ पोलिसांना माहिती देऊन तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सरमेशाला मृत घोषित केले. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पिंपळविहीर येथे आणल्यानंतर समाजातील नागरिकांचा बहिष्कार कायम राहिल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणी पुढे आले नाही. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी सरमेशाचे वडील पंचम भोसले व तिचा भाऊ बलदेव यांच्या व्यतिरिक्त समाजातील एकही व्यक्ती पुढे आला नाही.