मनाचे अस्तित्व मेंदूतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 04:29 AM2018-01-28T04:29:53+5:302018-01-28T04:30:25+5:30
बरेचदा मनात खूप मोठी घालमेल चालू असते. अस्वस्थता असते. काय करावं हे सुचतच नाही. अनेकदा यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. अशावेळी मनात आणि डोक्यात नेमके काय चालू असेल असे प्रश्न अनेकांना सतावतात. अशा अस्थिर वातावरणात नेमके काय करावे? मनाचे ऐकावे की मेंदूचे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न महिन्यातून एकदा.
- प्रा. रचना जाधव-पोतदार
या विषयाची सुरुवात करावी, असे सारखे मनात घोळतेय. कुठून आणि कसे सुरू करावे, याची योजना मनात हळूहळू आकार घेते आहे. खरेतर खूप संदर्भ, माहिती आणि ज्ञान मनात उफाळून येतेय आणि मनासारखी त्याची जुळवणी करण्याचा प्रयत्न आहे. या नवीन सदरातून...
मनी वसे ते स्वप्नी दिसे, (इथे मन म्हणजे ‘सतत केलेला विचार’ या अर्थाने आहे) मनाप्रमाणे, मनोजागता साथीदार, मनातल्या मनात केलेला विचार, मनोमन केलेला धावा, मन हेलावून टाकणारा अनुभव. संत कबीर यांच्या दोह्यात, ‘जैसा भोजन खाईये तैसा ही मन होय’ असे म्हटले आहे. तर साहिरजींच्या तरल काव्यरचनेत त्यांनी नितळ सुंदर असे मनाचे वर्णन केले आहे. ‘तोरा मन दर्पण कहलाये, भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाये...’
किती विविध छटांनी आणि अर्थांनी भरलेय हे मानवी मन. मानवी समाज संपूर्णपणे या विविधांगी आणि तितक्याच गूढ अशा मनावरच तर अवलंबून आहे.
काय आहे हे मन? कुठलासा अवयव आहे हा शरीरातला की, फक्त असण्याचा आभास आहे? कुठे असते हे मन? कसे आहे त्याच स्वरूप? ते कधी आणि कसे उमगते की हळुवार अनुभवातून घडते? आपण त्याला घडवतो की आपण त्याच्यामुळे घडतो? असे कितीतरी प्रश्न मनातच घोंगावतायत.
अगदी प्राचीन काळापासून ‘मन’ या गुढाची उकल करण्याचा प्रयत्न माणूस करत आला आहे. त्यात संपूर्ण जगभरातील अनेक तत्त्ववेते विचारवंत, कवी, साहित्यिक, संत, वैज्ञानिक, संशोधक यांनी योगदान दिले आहे. अध्यात्मिक अंगानेही मनाचा खूप सखोल विचार भारतीय संस्कृतीत केलेला आहे.
उपनिषदात शरीराचा आणि मनाच्या परस्पर संबंधांवर सखोल अभ्यास केलेला आहे. आपल्या वैदिक तत्त्वज्ञांनी २५०० एवढ्या मोठ्या वैदिक कालखंडात मानवी वर्तन आणि मन याचा सर्वांगाने विचार आणि अभ्यास केलेला आहे. तसेच भगवदगीता, उपनिषदे, वेद आणि विविध ग्रंथांतही मानवी वर्तनाचा सूक्ष्मतम पातळीवर केलेला अभ्यास दिसून येतो. जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या धर्मग्रंथांत आणि संस्कृतीत माणसाच्या वर्तनाचा गूढ मनाचा सामाजिक मानसशास्त्राचा, लैंगिकशास्त्राचा, शैक्षणिक मानसशास्त्राचा सखोल विचार आणि प्रदीर्घ मांडणी करण्यात आली आहे.
ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात ‘पतंजली’ हे वैज्ञानिक दृष्टीचे योगी होऊन गेले. ज्यांनी वैज्ञानिक दृष्टीने सर्वच गोष्टींची चिकित्सा क रण्याची शिकवण दिली. त्यांनी मनाला समजून घेण्यासाठी योगमार्ग दिला आहे. जो अनुभवाधिष्ठित आहे. त्यांच्या मते योग ही मनाची निर्गुण आणि निराकार अवस्था होणे, हे आहे. ‘माझं आणि मी’ हा विचार संपून मनात शांतता निर्माण होणे.
पतंजलीच्या मते, मन एक साधन आहे. त्याला किती मोकळीक द्यावी हे आपण ठरवायला हवे. मनातही चयापचयाप्रमाणे उलथापालथ सतत सुरू असते. जेव्हा मनाचे हे चलनवलन नियंत्रणात येते. तेव्हा मन स्वच्छ पाण्यासारखे नितळ होते आणि चित्त निर्मळ. म्हणजेच पतंजलीच्या म्हणण्यानुसार मनातला गोंधळ निवळतो.
गौतम बुद्धांनीही मनाला आणि शरीराला प्रमाणभूत मानून जीवनाचे दु:ख, वेदना आणि मृत्यू याविषयी तत्त्वज्ञान सांगितले आहे. गौतम बुद्ध म्हणतात, ‘मनाच्या प्रवाहाला हवे तसे वाहू दिले की, ते हळूहळू निवळत जाते. एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारे तात्पुरते विचार मनाला भांडावून सोडतात. मन अस्वस्थ होते, सैरभैर होते; पण जेव्हा मन स्थिर होते, तेव्हा मनाचे आभाळही निरभ्र होते आणि गोंधळाचे तरंग पावसासारखे हे मनोव्यापार अव्याहतपणे सुरू असतात.
स्वामी विवेकानंद या भारतीय श्रेष्ठ तत्त्वज्ञाने मनाच्या एकाग्रतेवर भर दिला आहे. एकाग्र मनाने माणूस आंतरिक आणि बाह्य जगाचे जास्त ज्ञान मिळवू शकतो, असे ते म्हणतात.
विवेकानंदाच्या शब्दात सांगायचे, तर ‘‘कोणत्याही समाजात लोकांना मिळणाºया संस्कारानुरूप ते सद्गुणी किंवा दुर्गुणी घडत जातात. म्हणून समाजाला सतत सुसंस्कारित करत राहणे, हे माणसाचे कर्तव्य आहे. अहंकार, वासना, आशा, तत्त्वज्ञान आणि धर्म हे माणसाचे मन घडवत असतात. मन म्हणजे एखादा पदार्थ नाही, तर शरीरामध्ये असलेला एक अतिसूक्ष्म भाग आहे.
महाराष्टÑाची भूमी संतांनी आपल्या निर्मितीने संस्कारित केली आहे. मनाच्या बहुआयामी स्वरूपाला त्यांनीही काळवेळानुरूप शब्दबद्ध केलेय. मथितार्थाने संत हे त्या वेळचे मानसशास्त्रज्ञच जणू. त्यांच्या काळानुसार त्यांनी समाजपुरुष आणि समाजमने घडवली आहेत. यांच्या शिकवणुकीतून समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहून मन कसे असावे, याचा पाठच घालून दिला आहे.
ज्ञानेश्वरांनीही ‘ज्ञानेश्वरी’त मन हे जलतत्त्वापासून निर्माण झाल्याचे म्हटले आहे. जसे पाणी उताराच्या दिशेने धाव घेते, तसेच संस्काररहित मन हे माणसाला अधोगतीला नेऊ शकते, म्हणून मन संस्कारित करण्याला खूप महत्त्व दिले आहे. मन किती विशाल आणि अचाट आहे, याचे वर्णन कवयित्री बहिणाबार्इंनीही केले आहे. अशा या मनाचे अस्तित्व इतरत्र कुठेही नसून, माणसाच्या मेंदूतच दडलेय. ते समजून घ्यायला मेंदू आणि मेंदू विज्ञानाचा इतिहास समजून घेणे, हा एक रोचक आणि रंगतदार प्रवास ठरेल.
आपल्या भावना, प्रेरणा, स्मृती, बोधन प्रक्रिया, जाणिवा आणि मेंदूत सतत चालणाºया नानाविध जैवरासायनिक प्रक्रियांचे एकत्रित फलित म्हणजे माणसाचे मन होय. ीेङ्म३्रङ्मल्ल२ - भावना, ेङ्म३्र५ं३्रङ्मल्ल - प्रेरणा, ेीेङ्म१८ - स्मृती, ूङ्मॅल्ल्र३्र५ी स्र१ङ्मूी१ूी२ - बोधन, २ील्ल२ं३्रङ्मल्ल - जाणिवा किंवा वेदना, स्री१ूीस्र३्रङ्मल्ल - संवेदना या सगळ््याचे भान ठेवून चला मग निघूया मेंदू विज्ञानाच्या रोमांचकारी सफरीला. .
(लेखिका मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)