साहेब, निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर पडा अन् पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:04 PM2019-10-26T12:04:46+5:302019-10-26T12:06:07+5:30
राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत.
मुंबई - राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पीक पाण्याखाली गेली आहेत. हाताशी आलेला खास पावसाने हिरावून नेलाय. राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने आणि प्रशासनाने निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर येऊन आता, शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता करायला हवी. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असेही मुंडेंनी म्हटले आहे.
परतीच्या पावासाचा फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी उभारलेली पीके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या पाण्यात सोयाबीनसह इतरही पिकांचं नुकसान झालं आहे. आधीच दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्याला यंदा ओला दुष्काळ मारक ठरत आहे. त्यामुळे, सरकारच्या आदेशाचे पालन करुन जिल्हा प्रशासनाने गतीमान होऊन पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे मुंडेंनी म्हटलंय.