Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:15 PM2024-06-01T19:15:55+5:302024-06-01T19:17:31+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी देशातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी येणाऱ्या अंतिम निकालाआधी एक्झिट पोलद्वारे निकालाबाबतचा अंदाज वर्तवला जात आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत ४१ जागा मिळवणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला यंदाच्या निवडणुकीत २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडी २३ ते २४ जागा मिळवेल, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. कारण राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पक्षफुटीची सहानुभूती महाविकास आघाडीला मिळेल, तर संघटनात्मक ताकदीचा फायदा महायुतीला होईल, असं बोललं जात होतं. एक्झिट पोलच्या अंदाजातही याचं प्रतिबिंब दिसत असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाली आहे.
एबीपी न्यूज-सी व्होटरचा एक्झिट पोल; कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण जागा - ४८
भाजप - १७
एकनाथ शिंदे यांची शिवसेना - ६
अजित पवार यांची राष्ट्रवादी - १
काँग्रेस - ८
शरद पवार यांची राष्ट्रवादी - ६
उद्धव ठाकरे यांची शिवसेना - ९
इतर - १