एक्झिट पोलचा कौल भाजपाला!
By admin | Published: October 16, 2014 05:25 AM2014-10-16T05:25:47+5:302014-10-16T09:38:41+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे, अशी निवडणूक आयोगाची प्राथमिक माहिती असून, किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे, अशी निवडणूक आयोगाची प्राथमिक माहिती असून, किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. अत्यंत चुरशीच्या आणि तितक्याच ऐतिहासिक अशा झालेल्या या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, हे रविवारी अधिकृतपणे स्पष्ट होईल; पण मतदानोत्तर चाचण्यांतून (एक्झिट पोल) मतदारांचा कौल भाजपाच्या बाजूने असला तरी कुणालाही निर्णायक बहुमत मिळेल, अशी शक्यता दिसून येत नाही. भाजपाला सर्वाधिक म्हणजे १२० ते १५१ जागा, तर त्याखालोखाल शिवसेनेला ७५ ते ९० जागा मिळतील, असे भाकीत एक्झिट पोलने वर्तविले आहे.
तेराव्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आदी दिग्गज नेत्यांसह एकूण ४,११९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज यंत्रबद्ध झाले. आॅक्टोबरची हीट, मतयंत्रातील बिघाड आणि विदर्भात काही ठिकाणी झालेला पाऊस यामुळे दुपारपर्यंत सगळीकडेच मतदान संथगतीने झाले. दुपारनंतर मात्र मतदानाची गती वाढली. राज्यातील एकूण मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आली नसून, प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात सर्वाधिक ८४ टक्के मतदान झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दैदिप्यमान यशामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकप्रियतेची कसोटी पाहणारी होती. त्यामुळे त्यांनी दोन्ही राज्यात अक्षरश: तळ ठोकून प्रचार सभांचा बार उडवून दिला. संपूर्ण निवडणूक त्यांच्याभोवतीच केंद्रित झाली होती. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे मतदारही संभ्रमात दिसून येत होते. सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजुने आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
वाहिन्यांचे अंदाज काय सांगतात?
चाणक्य, सी-व्होटर आणि नेल्सन या सर्व्हेक्षण संस्थांनी विविध वृत्त वाहिन्यासंोबत केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचा कौल भाजपाच्या बाजुने असल्याचा अंदाज वर्तविला आहे. चाणक्यने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजपाला सर्वाधिक १५१ जागा तर शिवसेनेला ७१ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र इतर सर्व्हेक्षणात भाजपाला १०३ ते
१२९च्या जवळपास जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जर हे अंदाज खरे ठरले, तर मग सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा कोणाची मदत घेणार, हा प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे. गरज पडली तर भाजपासोबत जाणार का, या प्रश्नावर शिवसेनेच्या नेत्यांनीही आपले मौन सोडलेले नाही. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असा दावा या दोन्ही पक्षाचे नेते करत आले आहेत. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला ४० ते ४५ तर राष्ट्रवादीला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंधरा वर्षानंतर राज्यात सत्तांतर होईल का, याचे उत्तर १९ आॅक्टोबरलाच मिळेल.