मतदानासाठी बाहेर पडा!

By admin | Published: February 19, 2017 03:06 AM2017-02-19T03:06:20+5:302017-02-19T03:06:20+5:30

१० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांच्या मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार,

Exit for voting! | मतदानासाठी बाहेर पडा!

मतदानासाठी बाहेर पडा!

Next

मुंबई : १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांच्या मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्समध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा क्षेत्रातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम/अखंडित उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांच्या विशेष सवलतीबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील सूचनांचे पालन मालक/ आस्थापनांनी केले नाही, तर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान, एखाद्या आस्थापनाने कर्मचाऱ्यांस मतदानाकरिता सवलत न दिल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी कामगार आयुक्त यांच्या मुंबईतील कार्यालयात किंवा प्रमुख निरीक्षक दुकाने व आस्थापना, मुंबई महापालिका या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार आयुक्तांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

2012 च्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान मतदानासाठी १ हजार ४५२ ठिकाणी मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत १०८ मतदान केंद्रे ही नव्याने झाली आहेत. त्यानुसार यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १ हजार ५६० ठिकाणी ७ हजार ३०४ मतदान केंद्रे आहेत.

तसेच यावेळी प्रभाग रचना व प्रभाग सीमा बदलल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान केले असेल, त्याच ठिकाणी यावेळी मतदान केंद्र असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेता मतदारांनी आपले मतदान केंद्र कुठे आहे याची खातरजमा मतदान चिठ्ठीच्या आधारे अथवा संबंधित संकेतस्थळाद्वारे किंवा अ‍ॅपद्वारे करावी, असेही देशमुख यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दंगल सुरु असतानाच प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जोमाने काम करत आहे. नागरिकांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने रॅलीसह विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे.
अशाच काहीशा पार्श्वभूमीवर सुज्ञ मुंबईकर मतदारांनी निर्भयपणे
आणि निष्पक्षपणे या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केले आहे.

मतदान चिठ्ठ्यांचे वाटप अंतिम टप्प्यात
२१ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. निवडणूक आयोगाच्या ५ जानेवारी २०१७ च्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावे असतील त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या मतदार यादीनुसार मतदान चिठ्ठ्यांचे वाटप महापालिकेद्वारे करण्यात येत असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण मतदार यादी ही महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.

मतदारांनी कुठे व कोणत्या मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जावे? ही माहिती शोधणे सुलभ होण्याच्या दृष्टीने True Voter हे अ‍ॅप राज्य निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आले
आहे. तसेच एका खासगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेलेhttps://operationblackdot.in  हे संकेतस्थळ देखील मतदारांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देखील मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Exit for voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.