गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 07:11 AM2024-12-12T07:11:02+5:302024-12-12T07:11:11+5:30

सुरुवातीला अमेरिका, बंगळुरूवरून ५५ झाडे मागवून मुरमाड जमिनीत लागवड केली. ती आता ३०० झाली. आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले.

Exotic fruit found on Google avocado farming; 10 lakhs per acre of yield; The success story of a farmer who flourished in a barren land | गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिक्षण बारावी पास. नंतर कृषी डिप्लोमा. घरी शेती पाच एकर पण सर्व मुरमाड. उत्पन्न तर घ्यायचे पण कसे, हा प्रश्न. अखेर विदेशी फळांचा गुगलवरून शोध घेतला. यूट्यूबवर व्हिडीओ पाहिले. त्यात ॲव्हाेकॅडो याची माहिती मिळाली. सुरुवातीला अमेरिका, बंगळुरूवरून ५५ झाडे मागवून मुरमाड जमिनीत लागवड केली. ती आता ३०० झाली. आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले असून एकरी १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देत आहेत. परमेश्वर आबासाहेब थोरात (वय ३७, शिवणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

लागवडीनंतर कधी मिळते फळ?
ॲव्होकॅडोची लागवड करण्यापूर्वी जमिनीत शेणखत, गांडूळ खत, रासायनिक खत टाकले जाते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात फळांची झाडे धुऊन स्वच्छ केली जातात. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. 
याच कालावधीत फुले येतात. फळे लागल्यापासून ते तोडण्यापर्यंत हा कालावधी सहा महिन्यांचा असतो. जून, जुलैमध्ये फळे तोडतात. वर्षातून एकवेळाच याचे उत्पादन घेता येते.  

अशी आली बीडला झाडे
अमेरिकेहून थेट झाडे, बिया किंवा वस्तू थेट आणण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे शेतकरी थोरात यांनी यासाठी त्यांच्या उद्योजक मित्राची मदत घेतली.
त्याच्या मार्फत अमेरिकेतील विद्यापीठातून बंगळुरू विद्यापीठात झाडे आणण्यात आली. तेथून पुढे ही झाडे बीडला आणण्यात आली. कृषीचे शिक्षण झालेले असल्याने याच झाडांचे कलम करून नवे रोप तयार केल्याचे थोरात म्हणाले.  

ऑनलाइन केला अभ्यास
२०१७ साली शेतकरी थोरात यांनी  गुगलवरून प्रगतशील देशांमधील विविध पिकांची माहिती घेतली.
यात इस्रायलमधील ॲव्हाेकॅडोची माहिती मिळाली. यासंदर्भात यूट्यूबवरून अभ्यास केला. याचे फायदे, तोटे यासह बाजारभावाचीही माहिती घेतली व लागवडीचा निर्णय घेतला.
n२०१८ मध्ये त्यांनी बंगळुरूमधून ५० झाडे आणली. २०२१ साली त्यांना पहिले उत्पन्न मिळाले. सर्व खर्च जाऊन यातून तीन ते चार लाख रुपये खिशात आले. २०२४ मध्ये त्यांनी  एक एकरमध्ये ३०० झाडे लावली.
nयामध्ये त्यांना सर्व खर्च जाऊन १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. ही फळे आरोग्यासाठी गुणकारी असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स्थानिक बाजारासह देशाबाहेरूनही मागणी होते. 

ॲव्होकॅडो फळाचे वजन साधारण २०० ते ५०० ग्रॅमपर्यंत असते. याला किलोप्रमाणे २०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो.  हे झाड लिंबू, मोसंबी याप्रमाणे दिसत असले तरी ते आंब्याच्या झाडासारखे होते. लागवड केल्यानंतर त्याचे आयुष्य हे जवळपास ५० वर्षे इतके आहे.     
- परमेश्वर थोरात, प्रगतशील शेतकरी
 

Web Title: Exotic fruit found on Google avocado farming; 10 lakhs per acre of yield; The success story of a farmer who flourished in a barren land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी