राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच, मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला माहिती
By यदू जोशी | Published: November 22, 2017 06:28 AM2017-11-22T06:28:33+5:302017-11-22T06:28:59+5:30
मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी निश्चितपणे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी निश्चितपणे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची सोमवारी रात्री अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हाच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे आणि शहांनी विस्तारास हिरवा झेंडा दाखविल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात दिले. ‘अधिवेशनापूर्वी विस्तार करणार हे आपण यापूर्वीच सांगितले असून त्यानुसार तो होईल’, असे मुख्यमंत्री आज म्हणाले.
अधिवेशन नागपुरात ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या महिन्याअखेर विस्तार होईल असे समजते. भाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही मंत्र्यांमध्ये फेरबदल होऊ शकतो. याबाबतचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत, असे समजते.
>एकट्या राणेंसाठी नाही
मंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सामावून घेण्यासाठी असेल काय, या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, तसे नाही. हा एकूणच विस्तार असेल. विस्ताराबाबत चर्चेसाठी पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ‘मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, पण त्याबाबत तारीख निश्चित नाही आणि ती विस्तारासाठी नसेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.