महाआघाडीचा महागोंधळ
By admin | Published: February 4, 2017 02:45 AM2017-02-04T02:45:29+5:302017-02-04T02:45:29+5:30
भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या
मुंबई : भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या रिपाइंने तब्बल ९० वॉर्डांमध्ये अर्ज भरल्याने उद्या माघारीची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रासपचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महायुतीची घोषणा करण्यात आली.
‘ज्यांच्यासोबत रिपाइं जातो त्यांची सत्ता येते, असे सांगून आठवले म्हणाले की, आम्ही भाजपाकडे अधिक जागा मागितल्या होत्या. ४० ते ४५ जागा मिळण्याची अपेक्षा होती. पण फार जागा मागून भाजपाची अडचण करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांसाठी चर्चेतून हा निर्णय घेतला.
महादेव जानकर म्हणाले की, भाजपाने आमच्या पक्षाला ६ जागा दिल्या, ती खूश आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय स्थापण्याची घोषणा करून ओबीसींना न्याय दिला आहे. भाजपा मित्र पक्षांचा मानसन्मान राखत आहे. आमच्या पक्षाला महायुतीमध्ये ४ जागा मिळाल्या. आम्ही समाधानी आहोत पण संतुष्ट नाही. निदान रासपाइतक्या म्हणजे ६ जागा तरी मिळायला हव्या होत्या, असे शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
रिपाइंला उपमहापौरपद
- भाजपाच्या नेतृत्वातील महाआघाडीचीच सत्ता येईल आणि त्यावेळी उपमहापौरपद व महत्त्वाच्या एका समितीचे अध्यक्षपद हे रिपाइंला देण्यात येईल. तसेच, इतर मित्रपक्षांनादेखील सन्मानाचे स्थान दिले जाईल, असे खा.रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांनी जाहीर केले.
शिवसंग्राम कमळावर
शिवसंग्रामचे चार उमेदवार हे कमळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. रिपाइंचे काही उमेदवारदेखील भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत. वॉर्डातील राजकीय परिस्थिती बघून तसे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
महायुतीमध्ये भाजपा १९२ रिपाइं २५, रासप ६ तर शिवसंग्राम ४ जागा लढणार आहे असे जाहीर करण्यात आले मात्र, रिपाइंला आणखी चार जागा देण्याचा विचार केला जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले.
रिपाइंला दिलेल्या २५ जागांपैकी पाच ते सात जागांवर भाजपानेही उमेदवार दिले आहेत. भाजपाकडे असलेल्या अनेक जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. ठरवून दिलेल्या जागांवरच दोघांचे उमेदवार लढतील आणि इतर माघार घेतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.