संघाच्या धर्तीवर भाजपातही विस्तारक
By Admin | Published: December 29, 2016 01:41 AM2016-12-29T01:41:23+5:302016-12-29T01:41:23+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर आता भारतीय जनता पार्टीमध्येही विस्तारक नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार १५ दिवसांपासून सहा महिने ते एक वर्षासाठी विस्तारक
- यदु जोशी, मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर आता भारतीय जनता पार्टीमध्येही विस्तारक नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार १५ दिवसांपासून सहा महिने ते एक वर्षासाठी विस्तारक म्हणून पक्षकार्य करता येईल.
जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पं.दीनदयाल उपाध्याय यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्या निमित्त भाजपाने राष्ट्रीय पातळीवर शताब्दी विस्तारक योजना हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रात प्रत्येक बुथवर एक या प्रमाणे सुमारे ९० हजार विस्तारक १५ दिवसांसाठी पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता दुसऱ्या गावातील बुथवर १५ दिवसांसाठी विस्तारक म्हणून जाईल. तेथील पक्षसदस्यांच्या भेटी घेईल, प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करेल. या विस्तारकांना ‘अल्पावधी शताब्दी विस्तारक’ असे संबोधण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे ५०० भाजपा कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या कामाचे नेमके स्वरुप काय असेल या संदर्भात चार दिवसांचे प्रशिक्षण शिबीर येत्या मार्चमध्ये होणार आहे. या योजनेसंदर्भात तीनशे प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आज मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. अ.भा.सहसंघटन मंत्री व्ही.सतीश आणि संतोष यांनी मार्गदर्शन केले. येत्या एप्रिलपासून ही विस्तारक योजना सुरू होणार असून ती २०१८ च्या जुलैपर्यंत चालेल. विस्तारक योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच जणांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि संघ परिवारातील एका संघटनेचे पदाधिकारी यांचाही समावेश असेल.
भाजपा आज केंद्र आणि राज्यातही सत्तेत असला तरी पक्षाचे यश दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर संघटन मजबूत असलेच पाहिजे. विस्तारकांची मजबूत फळी निर्माण करण्याचा हाच उद्देश आहे. हे विस्तारक राज्यातील एक कोटी सहा लाख पक्षसदस्यांना पक्षकार्यासाठी सक्रिय करतील.
- रामदास आंबटकर, राज्य संयोजक, विस्तार योजना