दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:45 AM2017-09-18T06:45:41+5:302017-09-18T06:46:02+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्र उत्सवानंतर होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे दिले असले तरी विस्ताराला दिवाळीनंतरच मुहूर्त लागेल, असे सूत्रांनी सांगितले. विस्तार लांबणीवर पडल्याने विद्यमान मंत्र्यांना दिवाळी गोड लागणार असून इच्छिुकांची प्रतीक्षा वाढणार आहे.
यदु जोशी।
मुंबई/ औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्र उत्सवानंतर होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे दिले असले तरी विस्ताराला दिवाळीनंतरच मुहूर्त लागेल, असे सूत्रांनी सांगितले. विस्तार लांबणीवर पडल्याने विद्यमान मंत्र्यांना दिवाळी गोड लागणार असून इच्छिुकांची प्रतीक्षा वाढणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस रविवारी औरंगाबादेत होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी छेडले असता, ‘नवरात्रीनंतर विस्तार करू’, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. मात्र, मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, कोणाला वगळणार, यावर त्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे नवरात्रीनंतर म्हणजे नेमके कधी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सूत्रांनी सांगितले की, चालू महिन्याअखेर मुख्यमंत्री विदेश दौºयावर जात आहेत. हे सरकार येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत आहे. या त्रिवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. सरकारची कामगिरी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची तयारी सुरू आहे. एकीकडे ही तयारी आणि दुसरीकडे दिवाळीच्या उत्सवी वातावरणात विस्तार होईल का, याबाबत साशंकता आहे. विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.
>खडसेंच्या वापसीचे काय?
एकनाथ खडसे यांच्या वापसीबाबत अनिश्चितता आहे. पुण्यातील भूखंड प्रकरणी त्यांची चौकशी करणाºया न्या. झोटिंग समितीचा अहवाल शासनाला सादर झालेला असला तरी तो विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सादर करावा लागेल. हे अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अहवालातील निष्कर्ष, त्यावरील मुख्यमंत्र्यांची भूमिका यावरच खडसेंचे परतणे अवलंबून असेल.
>शिवसेनेतही खांदेपालट
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर शिवसेनेच्या मंत्र्यांचा खांदेपालट होऊ शकतो. विद्यमान तीन कॅबिनेट मंत्र्यांबाबत शिवसेना आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावर ‘सबुरीने घ्या, मी योग्य वेळी निर्णय घेईन’, असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. कदाचित ते विस्ताराची वाट पाहत असावेत, अशी सेनेत चर्चा आहे.
>राणेंचा समावेश होणार?
दसºयापूर्वी आपण सीमोल्लंघन करणार असल्याचे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. राणे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि कालिदास कोळंबकर हे दोन आमदारही भाजपामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे खडसे यांच्या जागी राणे यांना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेना व काँग्रेसला सुरुंग लावण्याची खेळी केली जाऊ शकते. मात्र, भाजपामधून या शक्यतेला दुजोरा मिळाला नाही.
मंत्रिमंडळाचा आकार वाढणार
सध्या मंत्रिमंडळात २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री, असे ३९ मंत्री आहेत. शिवाय, पंकजा मुंडे व विद्या ठाकूर अशा दोनच महिला मंत्री आहेत.
संभाव्य विस्तारात आणखी एखाद्या महिला आमदाराचा नंबर लागू शकतो. विद्यमान मंत्र्यांपैकी भाजपाच्या २ कॅबिनेट, ३ राज्यमंत्र्यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज असल्याचे समजते.
काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची खाती असल्याने त्यांनाही प्रभावी कामगिरी दाखवता आलेली नाही. त्यामुळे तो अतिरिक्त पदभार काढून घेतला जाऊ शकतो.