शहर कार्यकारिणीचा लवकरच विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 01:37 AM2016-09-20T01:37:56+5:302016-09-20T01:37:56+5:30

शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली

Expansion of city executive soon | शहर कार्यकारिणीचा लवकरच विस्तार

शहर कार्यकारिणीचा लवकरच विस्तार

Next


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर नवनिर्वाचित कार्यकारिणीमुळे निर्माण झालेल्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी लवकरच शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे राज्यव्यापी दौरा करीत आहेत. सोमवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्याबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.
कार्यकारिणीवरून निर्माण झालेल्या नाराजीबाबत तटकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘पक्षाचे संघटन वाढते तेव्हा असे समज-गैरसमज होत असतात. कार्यकारिणीबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी व्यथा मांडल्या आहेत. लवकरच अधिक कार्यकर्त्यांना कार्यकारिणीवर स्थान देऊन त्याचा विस्तार केला जाईल. ’’
महापालिका निवडणुकांबाबत मित्रपक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर सोपविण्यात आले आहेत. त्यांनी याबाबत मित्रपक्षांची चर्चा करून निर्णय घ्यावेत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर एक बैठक झाली असून आणखी बैठका होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघत आहेत, त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीने आग्रही भूमिका घेतली होती, अशी मराठा क्रांती मोर्चाबाबत तटकरे यांनी भूमिका व्यक्त केली. (प्रतिनिधी)
शरद पवार घेणार विभागीय मेळावे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विभागीय मेळावे घेणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी या वेळी दिली. यामध्ये ग्रामपातळीपासून ते जिल्हापातळीवरचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा, काँग्रेस व मनसे पदाधिकारी राष्ट्रवादीत
निसर्ग मंगल कार्यालय येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत भाजपा, काँग्रेस व मनसेच्या ३१ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांना वेग आलेला आहे.

Web Title: Expansion of city executive soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.