ग्रामीण भागात शेतमाल प्रक्रिया उद्योगांचा विस्तार!
By Admin | Published: May 11, 2015 02:27 AM2015-05-11T02:27:01+5:302015-05-11T02:27:01+5:30
अकोला जिल्हय़ात कानशिवणी येथे शेतक-यांचा प्रकल्प.
अकोला : खेड्यातच शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने पावले उचलली जात असून, विदर्भात कृषिमालावर आधारित प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. आता अकोला जिल्हय़ातील येवता, विझोरा नंतर कानशिवणी येथे प्रक्रिया उद्योगाला सुरुवात होत आहे. या अगोदर कंझरा येथे महिला बचत गटासाठी कृषिमाल प्रक्रिया केंद्राची स्थापना केल्यांनतर आता याच जिल्हय़ातील कानशिवणी येथे शिवानंद वाघमारे या शेतकर्याचा शेतमाल प्रक्रिया उद्योग उभा राहत आहे. या ठिकाणी या शेतकर्याचे डाळ गिरणी, सफाई व पॉलिशर लावण्यात येत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषदेने, असे प्रकल्प खेड्यात निर्माण करण्याची जबाबदारी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणीपश्चात तंत्रज्ञान या विभागाकडे सोपविली आहे. विदर्भात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतात तयार होणारे कडधान्य, तृण धान्य इत्यादी पीक उत्पादनाचा आढावा घेण्यात आला असून, त्यानंतर या ठिकाणी पीकेव्ही दाल मिल, मसाला व शेवई आदी विविध यंत्र टाकण्यात येत आहेत. खेड्यातील शेतमालावर खेड्यातच प्रक्रिया करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीच्या माध्यमातून विदर्भातील शेतकर्यांनी उद्योग उभारावे, यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांना शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सहा गावांत कृषी माल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्राला गावकरी, शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शेतकरी, बचत गटासह अनेकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे.