कोराडी वीज केंद्राचा विस्तार बारगळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:02 AM2020-06-06T06:02:15+5:302020-06-06T06:02:28+5:30

बिकट आर्थिक स्थिती; नाशिक, परळीतील नवे युनिटही बारगळणार

Expansion of Koradi power station stalled | कोराडी वीज केंद्राचा विस्तार बारगळला

कोराडी वीज केंद्राचा विस्तार बारगळला

googlenewsNext

यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा मोठ्या प्रकल्पांना फटका बसायला सुरुवात झाली असून नागपूरनजीकच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा तब्बल नऊ हजार कोटी रुपये खर्चाचा विस्तार प्रकल्प तूर्त बारगळला आहे.
कोराडी वीज प्रकल्पात सध्या २४०० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. आणखी प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन युनिट उभे करण्यात येईल, असा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये घेण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रकल्प हाती न घेण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर गंडांतर येण्याची शक्यता असून त्याची पहिली टाच विदर्भातील प्रकल्पावर आली आहे.
एका मेगावॅटसाठी ७ कोटी रुपये खर्च येतो. १,३२० मेगावॅटसाठी ९,२४० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यातील ३० टक्के म्हणजे २,७७२ कोटी रुपयांचा भार राज्य शासनाला सहन करावा लागला असता आणि अन्य रकमेचे कर्ज वित्तीय संस्थांकडून घेणे अपेक्षित होते. राज्यातील वीज प्रकल्पांमधील ज्या युनिट तीस वर्षांहून अधिक जुन्या आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ते बंद करून त्या ठिकाणी सुपरक्रिटिकल टेक्नॉलॉजी युनिट उभारण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतली होती. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रदूषण होणार नाही, असा दावा करण्यात आला होता. कोराडीतील नवीन युनिटला वीज निर्मिती, महावितरण व पारेषण तसेच होल्डिंग कंपनीने मान्यता दिली होती. नंतर राज्य वीज नियामक आयोगानेही मान्यता दिली होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाने परवा असे प्रकल्प सध्या हाती न घेण्याचे ठरविल्यामुळे कोराडी पाठोपाठ नाशिक, चंद्रपूर, भुसावळ, परळी आदी ठिकाणी सुपर क्रिटिकल युनिटची उभारणी बारगळण्याची शक्यता आहे.

कोराडी वीज प्रकल्पाचा विस्तार रद्द करण्यात आलेला नाही. तो
स्थगित करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर या विस्ताराला विरोध होता. कोराडीचा विस्तार होणार नसेल तर तेथील प्रकल्प नाशिक किंवा अन्यत्र नेता कामा नये, अशी भूमिका मी मंत्रिमंडळात मांडली. नागपूरनजीक
५०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी मी आग्रही आहे.
- डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

Web Title: Expansion of Koradi power station stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज