राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 07:31 AM2023-07-01T07:31:29+5:302023-07-01T07:51:06+5:30
Cabinet Expansion : गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला.
छत्रपती संभाजीनगर / मुंबई - गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत सुरू होत असून, त्या आधीच विस्तार होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ९ ऑगस्ट २०२२ रोजी १८ मंत्र्यांचा समावेश करत विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर लवकरच विस्तार करू, असे शिंदे, फडणवीस यांनी सातत्याने सांगितले. मात्र विस्तार नेमका कधी करणार हे जाहीर केले नव्हते. फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना विस्तार याच महिन्यात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्यात विस्तार होणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १० जुलैपूर्वी होण्याची शक्यता आहे.
शिंदे समर्थक खासदारांना मोदी सरकारमध्ये संधी!
शिदे-फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटले आणि त्यांनी विस्ताराबाबत चर्चा केली. शहा यांनी विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला. शिंदे यांच्या समर्थक खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री असतील. विदर्भातील एकाला संधी दिली जाऊ शकते, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.