प्रभूकृपेमुळे रेल्वेमार्गांचा विस्तार
By Admin | Published: April 5, 2017 06:18 AM2017-04-05T06:18:40+5:302017-04-05T06:18:40+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरवण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करत २0१६-१७ मध्ये देशभरात २ हजार ८५५ किलोमीटरच्या नवीन लाईन, दुहेरीकरण आणि मार्गांचे परिवर्तन करुन ते प्रत्यक्षात कार्यान्वित केले. हे काम करतानाच ९३५ किलोमीटर नवीन मार्गांचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वेकडून नवीन लाईन, दुहेरीकरण, विद्युतीकरण यावर भर दिला जात असतानाच अपघातांना आळा बसावा यासाठी मानवरहित व मानवयुक्त रेल्वे फाटक बंद केले जात आहेत. सब-वे, पुल, पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. २0१६-१७ मध्ये भारतीय रेल्वे मार्गावर २,८५५ किलोमीटरच्या नवीन लाईन, दुहेरीकरण व रुळांमध्ये परिवर्तन करण्यात आले. हे काम करतानाच उत्तर-पूर्व क्षेत्रात संपूर्ण रुळ ब्रॉड (रुळांमधील अंतर वाढवणे)गेज करण्यात आले. देशभरातील रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन हजार किमीचे उद्दिष्ट वर्षभरात ठेवलेले असतानाच त्यापेक्षा जास्त म्हणजेच २,0१३ किमीचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे विजेची मोठी बचत होतानाच रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत मिळेल. देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. यातील बहुसंख्य मानव रहित फाटक आणि मानवयुक्त फाटकांजवळ होतात. त्यामुळे हे फाटक बंद करण्यात आले आहेत. २0१६-१७ मध्ये १ हजार ५0३ मानव रहित फाटक आणि ४८४ मानवयुक्त फाटक बंद केले आहेत. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी रेल्वेला आशा आहे. (प्रतिनिधी)
>२0१६-१७ मधील कामे
1306 रोड ओव्हरब्रीज, सब-वे कार्यान्वित
750 पुलांची दुरुस्ती
45 मालवाहतूक टर्मिनल
4280 प्रवासी डब्यांची निर्मिती.