महागलिच्छराष्ट्र ! शहरांचा स्वच्छता दर्जा खालावला, नवी मुंबई अपवाद
By admin | Published: May 5, 2017 04:51 AM2017-05-05T04:51:57+5:302017-05-05T04:51:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दोन वर्षे ‘स्वच्छ भारत मिशन’ जोरदारपणे हाती घेतले असले तरी महाराष्ट्रातील शहरे स्वच्छ होण्याऐवजी अधिक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दोन वर्षे ‘स्वच्छ भारत मिशन’ जोरदारपणे हाती घेतले असले तरी महाराष्ट्रातील शहरे स्वच्छ होण्याऐवजी अधिक गलिच्छ होत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने देशभरातील ४३४ शहरांमध्ये यंदा केलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’ची क्रमवारी त्या खात्याचे मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीत जाहीर केली. गेल्या वर्षीच्या अशाच सर्वेक्षणातील क्रमवारीशी तुलना केली तर महाराष्ट्रातील शहरांचा स्वच्छता दर्जा खालावत असल्याचे चित्र दिसते. याला अपवाद आहे फक्त नवी मुंबईचा. गेल्या वर्षी देशपातळीवर १२व्या क्रमांकावर राहिलेल्या नव्या मुंबईने यंदा आठवा क्रमांक मिळवून देशातील सर्वांत स्वच्छ १० शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. ४३३व्या क्रमांकावर आलेले भुसावळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत गलिच्छ शहर ठरले आहे.
गेल्या वर्षीचे सर्वेक्षण देशभरातील ७३ शहरांमध्ये केले होते व त्यांत महाराष्ट्रातील १० शहरांनी ९ ते ६४ या दरम्यानची स्थाने मिळविली होती. यंदाचे सर्वेक्षण ४३४ शहरांमध्ये केले गेले. त्यात महाराष्ट्रातील ४४ शहरांनी सहभाग घेतला व त्यांची क्रमवारी आठ ते ४३३ या दरम्यान राहिली. देशपातळीवरील पहिल्या ५० क्रमांकांमध्ये राज्यातील नवी मुंबई (८), पुणे (१३) आणि बृहन्मुंबई (२९) ही फक्त तीन शहरे स्थान मिळवू शकली. नवी मुंबईचा अपवाद वगळता गतवर्षी व यंदाच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शहरांचे क्रमवारीतील स्थान घसरले आहे. ही घसरण अशी झाली आहे- पिंपरी-चिंचवड ९वरून ७२, बृहन्मुंबई १० वरून २९, पुणे ११ वरून १३, ठाणे १७ वरून ११६, नागपूर २० वरून १३७, नाशिक ३१ वरून १५१, वर्स-विरार ३५ वरून १३९, औरंगाबाद ५६ वरून २९९ आणि कल्याण-डोंबिवली ६४ वरून २३४.
गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात ‘लीडर्स’ म्हणून निवडलेल्या १५ शहरांमध्ये राज्यातील पुणे व नवी मुंबई ही शहरे होती. २० ‘अॅस्पायरिंग लीडर्स’पैकी ठाणे, नागपूर, नाशिक आणि वसई-विरार होती तर ३७ ‘स्लो मूव्हर्स’मध्ये औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवलीचा समावेश होता. अर्थात ज्या शहरांची क्रमवारी घसरली आहे ती गेल्यावर्षीपेक्षा यावेळी स्पर्धक जास्त होते, अशी सबब सांगून सांत्वन करून घेऊ शकतील.
नगरविकास मंत्रालयाच्या वतीने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ने हे सर्वेक्षण केले. एकूण दोन हजारांपैकी गुण देऊन सर्वेक्षण केलेल्या शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली. यापैकी ९०० गुण हागणदारीमुक्ती व घनकचरा व्यवस्थापन यासाठी होते. ६०० गुण नागरिकांकडून मिळालेल्या ‘फीडबॅक’नुसार देण्यात आले तर ५०० गुण त्रयस्थ निरीक्षकांनी अचानकपणे केलेल्या निरीक्षणावर देण्यात आले. देशभरातील ३७ लाख नागरिकांनी या सर्वेक्षणासाठी ‘फीडबॅक’ दिला व म्हणूनच व्यंकय्या नायुडू यांनी हा ‘नागरिकांचा कौल’ असल्याचे
म्हटले. (विशेष प्रतिनिधी)
गेल्या वर्षी ‘अॅस्पायरिंग लीडर्स’ या वर्गात गणली गेलेली ठाणे, नागपूर, नाशिक व वसई-विरार ही शहरे यंदा ढेपाळली. क्रमवारीतील ठाण्याचे स्थान ९९, नागपूरचे ११७, नाशिकचे १२० तर वसई-विरार १०४ क्रमांकावर आले.
शहरांची क्रमवारी
यंदाच्या सर्वेक्षणात सहभागी झालेली राज्यातील शहरे व त्यांची देशपातळीवरील क्रमवारी (कंसात)
नवी मुंबई (८), पुणे (१३), बृहन्मुंबई (२९), शिर्डी (५६), पिंपरी-चिंचवड (७२), चंद्रपूर (७६), अंबरनाथ (८९), सोलापूर (११५), ठाणे (११६), धुळे (१२४), मीरा-भार्इंदर (१३०), नागपूर (१३७), वसई-विरार (१३९), इचलकरंजी (१४१), नाशिक (१५१), सातारा (१५७), कुळगाव-बदलापूर (१५८), जळगाव (१६२), पनवेल (१७०), कोल्हापूर (१७७), नंदुरबार (१८१), अहमदनगर (१८३), नांदेड-वाघाळा (१९२), उल्हासनगर (२०७), उस्मानाबाद (२१९), परभणी (२२९), यवतमाळ (२३०), अमरावती (२३१), कल्याण-डोंबिवली (२३४), सांगली-मिरज-कुपवाड (२३७), मालेगाव (२३९), उदगीर (२४०), बार्शी (२८७), अकोला (२९६), औरंगाबाद (२९९), बीड (३०२), अचलपूर (३११), वर्धा (३१३), लातूर (३१८), गोंदिया (३४३), हिंगणघाट (३५५), जालना (३६८), भिवंडी-निजामपूर (३९२) व भुसावळ (४३३).
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा
शहर२०१६२०१७
पिंपरी-चिंचवड ०९ ७२
बृहन्मुंबई १० २९
पुणे ११ १३
ठाणे १७ ११६
नागपूर २० १३७
नाशिक ३१ १५१
औरंगाबाद ५६ २९९
नवी मुंबईची छाप
या अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत.
गेल्या वर्षीच्या क्रमवारीत पुणे आणि नवी मुंबईचा समावेश ‘लीडर्स’ या वर्गात केला गेला होता. नवी मुंबईने गतवर्षीच्या तुलनेत क्रमवारीत चार अंक वर जाऊन ही बिरुदावली सार्थ ठरविली. गेल्या वर्षी औरंगाबाद व कल्याण-डोंबिवली ही दोन
शहरे ‘स्लो मूव्हर्स’ या वर्गात होती. यंदा क्रमवारीत त्यांनी अनुक्रमे २४३ व १७० स्थानांची गटांगळी खाल्ल्याने ती ‘स्लो’ नव्हे, तर ‘बॅकवर्ड मूव्हर’ ठरली.
देशात इंदूर सर्वांत स्वच्छ शहर :या क्रमवारीत पहिले स्थान पटकावून इंदूर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले. याखेरीज भोपाळ, विशाखापट्टणम्, सूरत, म्हैसूर, त्रिचनापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि वडोदरा या शहरांनी त्याच क्रमाने पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये स्थान पटकाविले. पहिल्या ५० क्रमांकांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशची ३१ शहरे आली. तेलंगण व तमिळनाडूची प्रत्येकी चार तर महाराष्ट्रातील तीन शहरांचा पहिल्या ५०मध्ये समावेश झाला.