मराठवाड्याला ‘पॅकेज’ची अपेक्षा
By Admin | Published: September 1, 2015 01:59 AM2015-09-01T01:59:01+5:302015-09-01T01:59:01+5:30
तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे
विकास राऊत, औरंगाबाद
तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ सप्टेंबरपासून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील पीक-पाण्याचा आढावा घेणार आहेत. दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
पाऊसच नसल्याने विभागात खरीप हंगाम वाया गेला. लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
बसला. उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता जळालेले पीक पाहण्यावाचून काहीच उरलेले नाही. त्यातच
कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मराठवाड्यातील एकूण ४३ लाख ९४० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२ लाख ५३८ हेक्टरवर (७५ टक्के) खरीप पेरणी झाली. मात्र पावसाअभावी पेरणी वाया गेली. विभागात आजवर केवळ ३२ टक्के पाऊस झाला.
भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला आहे. एक हजार गावे टंचाईग्रस्त झाली असून, १ हजार ३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
विभागातील ७ जिल्ह्यांमधील चारा छावण्यांसाठी आगामी तीन महिन्यांसाठी ३०० कोटींचा निधी लागेल. पशुधन वाचविण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात प्राधान्याने छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंगोली वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांतील पशुधनासाठी रोज तीन ते सव्वातीन कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल प्रशासनाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील स्थितीचा आॅगस्टमध्ये आढावा घेतला. केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग यांनी आॅगस्टच्या मध्यास विभागाचा धावता दौरा केला. त्यानंतर २३ व २४ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. त्यात मराठवाड्याचा अनुशेषही गाजला.