पीडितांच्या कुटुंबीयांना पुनर्वसनाची अपेक्षा
By admin | Published: November 10, 2016 05:35 AM2016-11-10T05:35:08+5:302016-11-10T05:35:08+5:30
बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत
पंढरीनाथ गवळी, भुसावळ (जि. जळगाव)
बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत, मात्र शासनाने पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे. गावोगावी भाकरी मागून खाणे आम्ही बंद करु. त्यामुळे आमच्या मुलाबाळांची होणारी आबाळ तरी थांबेल,अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी गेलेल्या हलखेडा (ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील आदिवासी मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणाला आठ दिवस झाले. पोलीस व सरकारी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी गावात येत आहेत. मात्र पीडित कुटुंबांना अजून पुरेशी मदत मिळालेली नाही.
गावात अत्याचाराच्या वेदनेचे सावट पसरले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हलखेडा गावात आदिवासींची रोजच्या भाकरीसाठी लढाई सुरूच आहे. त्यात नवे संकट आले आहे. हलखेड्यात दहावी पास झालेली दोन मुले व बारावी झालेली एक मुलगी आहे. बाकी संपूर्ण गाव निरक्षर. मुलींना शिकायला पाठविले तर हे असे विपरित घडल्याची भावना आदिवासींची आहे.
घटनेनंतर अनेक कुुटुंबे भटकंतीसाठी रवाना झाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले-मुलीही आहेत. शेती नसल्याने काही जण दुसऱ्याची शेती करतात. यावर्षी कापूस व ज्वारीचे उत्पन्न आले नाही. त्यामुळे रुद्राक्ष माळा विक्रीसाठी आदिवासी पंढरपूर, उज्जैन, अलाहाबाद, जुनागडकडे गेली आहेत.
काही कुटुंब गावातच लाहुरी-तितर पकडून संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यात कोठे चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर पोलीस आम्हालाच पकडतात. जबर मारहाण करतात. गुन्हेगारी जमात म्हणतात. हा शिक्का पुसला गेला पाहिजे. हे सर्व केव्हा थांबेल, असा आदिवासींचा सवाल आहे.
हलखेडा, लालगोटा ही गावे शंभर टक्के आदिवासींची. या समाजासाठीच्या योजनांची येथे अंमलबजावणी झाली नसल्याचे वास्तव आहे. रस्ते नाही, पाणी लांबून आणावे लागते. सुरक्षेची साधने नाहीत, असे हे आडवळणाचे जंगलातील गाव आहे. पीडित मुलींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती मिळाली. पालकांनी मुलांना खर्चासाठी पाठविलेले पैसे देखील शिक्षक आणि रितूसिंग काढून घ्यायचा. मुलांना दमबाजी करायचा, असेही पालकांनी सांगितले.
आश्रम शाळेतील हॉलमध्ये मुले, मुली झोपायचे. तेव्हा दरवाजाला आतून कडी लावू देण्यास शिक्षक आणि रितूसिंग मनाई करायचा. कडी लावली तर मारायचा, असे पालक सांगतात.