शस्त्रसाठा प्रकरणी आज निकाल अपेक्षित
By admin | Published: July 28, 2016 01:47 AM2016-07-28T01:47:36+5:302016-07-28T01:47:36+5:30
विशेष मोक्का न्यायालय औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणाचा निकाल आज देणे अपेक्षित आहे. तब्बल दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.
मुंबई : विशेष मोक्का न्यायालय औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणाचा निकाल आज देणे अपेक्षित आहे. तब्बल दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.
औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) २२ जणांना अटक केली आहे. त्यात लष्कर-ए- तोयबाचा सदस्य आणि २६/११ च्या हल्ल्याच्या कटात सामील असलेला सय्यद झबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याचा समावेश आहे.
‘विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आहे. न्यायालय यावर गुरुवारी निकाल देणे अपेक्षित आहे,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
८ मे २००६ रोजी एटीएसने चांदवड- मनमाड हायवेवर एका टाटा सुमोचा आणि इंडिका कारचा पाठलाग केला. पोलिसांनी तीन जणांना अटक करत ३० किलो आरडीएक्स, १० एके- ४७ आणि ३,२०० जिवंत काडतुसे जप्त केली. जुंदाल बीड जिल्ह्यात राहतो. पोलिसांना चुकवून तो मालेगावला गेला. तिथून तो बांगलादेश आणि त्यानंतर तो पाकिस्तानला गेला. २०१२ मध्ये त्याला सौदी अरेबियामधून अटक करून भारतात आणले.
विशेष न्यायालयाने आॅगस्ट २०१३ मध्ये २२ आरोपींवर आरोप निश्चित केले. खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी १०० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचावपक्षाच्या वकिलांनी १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. (प्रतिनिधी)