एटीएमच्या बदलांना दीड हजार कोटींचा खर्च
By Admin | Published: November 16, 2016 02:56 PM2016-11-16T14:56:16+5:302016-11-16T17:42:09+5:30
२ हजारांची नवी नोट तसेच भविष्यात येणारी ५०० रूपयांची नोट लांबी व रुंदीलाही आकारात वेगळी असल्याने देशभरातील अडीच लाखपेक्षा जास्त एटीएम यंत्रांचे सेटिंग बदलावे लागणार आहे.
> नव्या नोटेचा फटका: अडीच लाख यंत्रात करावा लागणार बदल
राजू इनामदार, ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १६ - पेन किंवा कागदाला हातही न लावता एटीएम यंत्रातून नोटा मिळवण्याची सवय लागलेल्या नागरिकांना बँकेत जाऊन विड्रॉ स्लिपने पैसे काढणे अवघड जात आहे. मात्र हा त्रास त्यांना अजून काही महिने तरी सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. २ हजार रूपयांची चलनात आलेली नवी नोट तसेच भविष्यात येणारी ५०० रूपयांची नोट लांबी व रुंदीलाही आकारात वेगळी असल्याने देशभरातील अडीच लाखपेक्षा जास्त एटीएम यंत्रांचे सेटिंग बदलावे लागणार आहे.
या क्षेत्रातील काही तज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची तांत्रिक माहिती दिली. एटीएम यंत्रात फिक्स डायमेन्शन व डायनॅमिक डायमेन्शन अशा दोन पैकी एक कॅसेट असते. यातील कोणत्याही कॅसेटमध्ये नव्या २ हजार रूपयांच्या नोटेचे कॉन्फ्रिेगेशन करायचे असेल तर हार्डवेअर व सॉफ्टवेअर असा दोन्हींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर फक्त १०० रूपयांच्या नोटा मिळण्यासाठीच हे यंत्र उपयुक्त ठरेल.
डायनॅमिक डायमेन्शनच्या कॅसेटमध्ये दोन फ्यूज असतात. त्या फ्यूजवरून कॅसेटचे डायमेन्शन नव्या नोटेच्या आकाराप्रमाणे बदलून घ्यावे लागणार आहे.. फिक्स डायमेन्शच्या कॅसेटमध्ये नव्या नोटेच्या आकाराची वेगळी कॅसेटच बसवावी लागेल. नव्या २ हजार रूपयांची नोट आकारात जास्त असली तरी जाडीमध्ये अगदीच कमी असल्याने पुर्वीपेक्षा जास्त नोटा यंत्रात बसतील. त्यांचे मुल्यही २ हजार म्हणजे पुर्वीपेक्षा दुप्पट असल्याने जास्त पैसे यंत्रातून मिळतील.
हा तांत्रिक बदल केल्यानंतरही एटीएम लगेचच नव्या नोटा देण्यासाठी सज्ज असेल असे नाही. त्यासाठी बँकेला एटीएम यंत्राच्या अॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हाईडरला (स्विच प्रोव्हाईडर) याबाबत माहिती देणे गरजेचे असते. कॅसेट १ ते ४ अशी प्रत्येक कॅसेटची स्वतंत्र माहिती पुरवावी लागेल. ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर असते. त्यातच बदल करावा लागणार आहे.
ज्या एटीएम यंत्रांमध्ये दोनच कॅसेट वापरल्या जात आहेत, (फक्त ५०० व १०० च्या नोटा किंवा १ हजार व ५०० च्या नोटा) त्यांना आणखी दोन कॅसेटचाा संच यंत्राला बसवावा लागणार आहे. अर्थातच यंत्रामध्ये तशी सुविधा दिली असेल तरच असे करता येईल, अन्यथा ते यंत्र फक्त दोनच प्रकारच्या नोटा देत राहील. यासाठीचा अंदाजे खर्च ७० ते ८० हजार इतका आहे. अशी किमान लाखभर यंत्रे असावीत असा अंदाज आहे.
यंत्रात कॅसेट बसविल्यानंतर कोणत्या कॅसेटमध्ये किती आकाराचे व मुल्याचे पैसे असतील ते सर्व्हिस प्रोव्हाईडरला कळवावे लागेल. त्याप्रमाणे स्वीचमध्ये तसे बदल करावे लागतात. तसेच बदल केले की नव्या नोटा एटीएम यंत्रातून येतात किंवा नाही याची टेस्टिंग घेतली जाईल व नंतरच ही एटीएम यंत्र ग्राहकांना मागणी केल्यानंतर पैसे देण्यासाठी सज्ज होतील.
देशात सध्या अडीच लाखांपेक्षा जास्त यंत्र आहेत. त्यातील काही बँकांच्याच मालकीची तर काही खासगी कंपन्यांची व त्यांनी बँकाना भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. काही उद्योगसुमहांची त्यांच्या कर्मचा-यांसाठीची खासगी एटीएम यंत्रही आहेत. बदलाचा खर्च यंत्र ज्यांच्या मालकीची आहेत त्यांनाच करावा लागेल. हा खर्च हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त होणार आहे.