बिबरच्या कॉन्सर्टनंतर परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच
By admin | Published: May 12, 2017 03:12 AM2017-05-12T03:12:18+5:302017-05-12T03:12:18+5:30
कॅनेडिअन पॉप गायक जस्टीन बिबरचा मुंबईतला लाइव्ह कॉन्सर्ट हा गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरला होता.
प्राची सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कॅनेडिअन पॉप गायक जस्टीन बिबरचा मुंबईतला लाइव्ह कॉन्सर्ट हा गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरला होता. म्युझिकल कॉन्सर्टवर झिंगाटपणे थिरकल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. मद्याच्या बाटल्यांबरोबरच उरलेले अन्न, बिर्याणीची पाकिटे, प्लास्टिकच्या बाटल्या, जंक फूड आदी कचरा जमा झाल्याचे पाहायला मिळते.
या ठिकाणी असलेल्या सर्व्हिस रोडवर देखील ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्या, उरलेल्या अन्नाची पाकिटे, खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. प्रवेशद्वाराच्या शेजारीदेखील कचऱ्याचा ढीग पाहायला मिळत आहे. सकाळी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यात आला नव्हता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मात्र दुपारी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कचरा उचलण्यास सुरुवात केली. या वेळी तरुणांनी अर्धवट खाऊन टाकलेल्या अन्नाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पार्किंग परिसरातही बिर्याणीची पाकिटे, शिल्लक राहिलेले अन्न, शीतपेय आणि मद्याच्या बाटल्या दिसून आल्या.
दुपारनंतर स्टेडियमवरील सेटअप काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पुढील दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. रोजच्या कामाबरोबरच या कॉन्सर्टनंतर जमा झालेला कचरा उचलण्याकरिता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागली असून त्यांच्याकामाचा बोजा वाढला.
स्टेडियम परिसरात अस्वच्छता-
२३ वर्षीय जस्टीन बिबरच्या या ९० मिनिटांच्या शोसाठी तब्बल १०० कोटी मोजण्यात आले. या कार्यक्रमाच्या सेटअपसाठी २६ कोटी आणि जस्टीनचा प्रवास खर्च, राहणे, त्याच्या लक्झरीयस मागण्यांकरिता जवळपास २५ ते ३० कोटींचा खर्च करण्यात आला होता. कॉन्सर्टपूर्वी पूर्ण परिसराची विशेष स्वच्छता, सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर मात्र नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात दारूच्या बाटल्या, बिर्याणीची पाकिटे टाकून देण्यात आल्याने विद्रूपीकरण झाले आहे.