‘शिवशाही’ एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:04 AM2018-02-24T05:04:19+5:302018-02-24T05:04:19+5:30
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अंतर्गत शिवशाही वातानुकूलित बस एसटी महामंडळात दाखल झाली.
मुंबई : परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अंतर्गत शिवशाही वातानुकूलित बस एसटी महामंडळात दाखल झाली. लवकरच २ हजार शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र सध्या धावत असलेल्या शिवशाही बसच्या उत्पन्नापेक्षा ५ कोटी ३६ लाख ४१ हजार ६८१ रुपये खर्च अधिक असल्याचे माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रातून समोर आले आहे.
जून २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या सहा महिन्यांतील वातानुकूलित बसवरील खर्च आणि उत्पन्न माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आले होते. यानुसार महामंडळाने दिलेल्या माहितीमध्ये वातानुकूलित बसचे एकूण उत्पन्न १४ कोटी ६९ लाख २५ हजार ४४१ रुपये असल्याची माहिती दिली. तर वातानुकूलित बसवरील खर्च एकूण २० कोटी ५ लाख ६७ हजार १२२ रुपये असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाला खासगी कंपन्यांना करारापोटी आणि डिझेलसाठी एकूण १६ कोटी ७३ लाख ८४ हजार २०६ रुपये द्यावे लागत आहेत. तसेच महामंडळाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांसाठी २ कोटी ५१ लाख
२ हजार १७ रुपये दिले आहेत. तर केवळ ८० लाख ८० हजार ८९९ रुपये महामंडळाने शासनाला प्रवासी कर म्हणून दिले आहेत. यामुळे एकूण उत्पन्नापेक्षा ५ कोटी ३६ लाख ४१ हजार ६८१ रुपये खर्च अधिक असल्याचे दिसून आले.
एसटी महामंडळातील लाल रंगाच्या पारंपरिक एसटीच्या जागी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाही बसचा समावेश करण्याचा निर्णय मंत्री रावते यांनी घेतला. यानुसार १५०० भाडेतत्त्वावर आणि ५०० स्वमालकीच्या अशा एकूण दोन हजार शिवशाही मार्चअखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यात १५० शयनयान शिवशाही बसचा देखील समावेश आहे. सुमारे १८ रुपये प्रतिकिलोमीटर या दराने महामंडळ भाडेतत्त्वावरील संबंधित कंपनीला पैसे देणार आहे. मात्र या शिवशाहीच्या उत्पनापेक्षा खर्च अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिवशाहीमुळे उत्पन्नात वाढ होईल, प्रवासी संख्या वाढेल असे एसटी महामंडळाला वाटले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाल्याचे दिसत नाही.
एसटी महामंडळाला २०१३-१४ साली ३८२ कोटी, २०१४-१५ साली ५७२ कोटी ६२ लाख, २०१५-१६ साली १ हजार ८०७ कोटी आणि २०१६-१७ साली २ हजार ३१२ कोटींचा तोटा आहे. परिणामी नव्याने महागड्या शिवशाही घेण्यासाठी झालेल्या बैठकीत एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नापसंती दर्शवली होती.