सहस्रबुद्धे यांचा अनुभव उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री
By admin | Published: September 19, 2016 01:47 AM2016-09-19T01:47:59+5:302016-09-19T01:47:59+5:30
खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संस्थात्मक व देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे बौद्धिक योगदान दिले आहे.
मुंबई : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संस्थात्मक व देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे बौद्धिक योगदान दिले आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने ज्ञानाच्या क्षेत्रातील धोरणनिर्मितीत त्यांच्या कार्याचा व अनुभवाचा निश्चित उपयोग होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष प्रतापभाई आशर, सदस्य अरविंदराव रेगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. सहस्रबुद्धे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यकर्ते, नेते निर्माण केले. प्रबोधिनीत विविध विषयांवर संशोधन आणि प्रशिक्षणांचे आयोजन करून कार्यकर्ते आणि नेत्यांची बौद्धिक फळी निर्माण करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग धोरणनिर्मितीसाठी निश्चित होईल. प्रबोधिनीच्या वतीने विविध प्रशिक्षणांचे आयोजन व संशोधन प्रकल्प राबवून समाजाची बौद्धिक संपदा वाढविण्यासाठी योगदान दिले जात आहे. या संस्थेचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे, अशी भावना सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.