यंदाचे पहिले चंद्रग्रहण अनुभवा शुक्रवारी...; चंद्र जाणार पृथ्वीच्या उपछायेतून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 09:30 AM2023-05-02T09:30:28+5:302023-05-02T09:30:41+5:30
गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
मुंबई : भारतातून ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणारे हे या वर्षीचे पहिले ग्रहण असेल. ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असल्याने चंद्र किंचित अंधूक होतो म्हणून त्याला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पॅसिफिक, इंडियन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल. ५ मे रोजी ग्रहणाला भारतीय वेळेनुसार रात्री ८:४४ वाजता सुरुवात होईल. ग्रहणमध्य १०:५२ तर ग्रहण समाप्ती मध्यरात्री १:१ वाजता होईल.
२० एप्रिल रोजी हायब्रीड सूर्यग्रहण झाले होते. परंतु ते भारतातून दिसले नाही. ५ मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण खगोलीय दृष्टीने महत्त्वाचे आहे. छायाकल्प ग्रहण म्हणजे खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. त्यामुळे चंद्र काळा, लाल दिसतो. परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र काळा, लाल दिसत नाही. तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच; परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात.
चंद्र ग्रहणावेळी सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या असतात. गडद सावली आणि उपछाया. गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
कसे असते ग्रहण?
छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो. परंतु त्याचे तेज ग्रहण काळात ४ ते ५ टक्क्यांनी कमी होते किंवा गडद छायेकडील चंद्र बिंबाचा थोडा भाग किंचित काळपट दिसतो. बारकाईने पाहिल्यास हा फरक जाणवतो. अन्यथा नियमित निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तींना चंद्रग्रहण लागले हे कळत नाही. आकाश ढगाळ नसेल तर साध्या डोळ्याने घरूनच ग्रहण बघावे.