भोगलेले आयुष्यच उतरले कवितेत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 02:45 PM2023-08-04T14:45:01+5:302023-08-04T14:56:09+5:30
पळसखेडसारख्या छोट्याशा गावात ते जीवनभर राहिले. ते गाव, तिथली त्यांची सुरुवातीची छोटी शेती, नंतर वाढवलेली शेती, बागायत, शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याशी त्यांचे जीवन कायम निगडित राहिले.
डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
महानोर हे फार मोठे निसर्गकवी. त्यांनी निसर्गातल्या प्रतिमा मानवी भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या. ते हाडाचे शेतकरी होते. त्यांचं वैयक्तिक जीवन शेती, माती, पाऊस, दुष्काळाशी जोडलेलं होतं. सगळ्या भारतातल्या शेतकरी मनाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्याच्याशी नाळ जोडलेली त्यांची कविता आहे. हे असं क्वचित घडतं. त्यांचा ‘अजिंठा’ हा किंवा अन्य काव्यसंग्रह वाचताना याची प्रचिती येते.
पळसखेडसारख्या छोट्याशा गावात ते जीवनभर राहिले. ते गाव, तिथली त्यांची सुरुवातीची छोटी शेती, नंतर वाढवलेली शेती, बागायत, शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याशी त्यांचे जीवन कायम निगडित राहिले.
विधान परिषदेत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जोरकसपणे मांडले. राजकारणात जसे वक्ते असतात, तशी भाषणं त्यांनी केली नाहीत, तर शेतकरी प्रश्नांवरची त्यांची ही भाषणे अत्यंत गंभीर आणि अभ्यासपूर्ण आहेत.
माझ्या ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’ या चित्रपटांसाठी त्यांच्या ज्या कविता गीताच्या रूपात आल्या, त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. या गीतांना पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेल्या सुंदर चाली आणि दिग्गज गायकांचा आवाज या आधी दर्जेदार काव्य हे याचे कारण होते. त्यांनी त्यांच्या खानदेशी बोलीभाषेतील अनेक नवीन शब्द या काव्याच्या रूपाने मराठीत आणले.
जैन इरिगेशनने सुरू केलेल्या साहित्यिक उपक्रमाची धुरा महानोर यांनी अत्यंत उत्तमरीत्या सांभाळली. भवरलाल जैन यांच्यासोबत त्यांनी बहिणाबाई पुरस्कार आणि अन्य साहित्यिक उपक्रमांना आकार देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
शेवटच्या दहा-पंधरा दिवसांत त्यांना खूप त्रास झाला याचं वाईट वाटतं. ‘एक होत विदूषक’ या चित्रपटाला आनंद मोडक यांनी संगीत दिलं. या चित्रपटासाठी लावणी कुणी लिहावी अशी चर्चा सुरू होती. तेव्हा महानोरांनीच लावणी लिहावी, असं मी म्हटलं. त्यानंतर महानोरांनी अत्यंत सकस लावणी लिहिली. शब्दाला शब्द लावून किंवा केवळ महिलेच्या अंगांचं वर्णन केलेली ही लावणी नव्हती. ‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं... श्रावणाचं ऊन मला झेपेना...’अशी ती लावणी अत्यंत लोकप्रिय आहे.