अभ्यासक्रमातील विज्ञानाचे प्रयोग मोबाईल अॅपमध्ये
By admin | Published: July 10, 2016 10:37 PM2016-07-10T22:37:13+5:302016-07-10T22:37:13+5:30
गणिताप्रमाणेच विज्ञानाचे विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. त्यामुळेच हे विषय समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाची जोड दिली आहे.
वर्ग १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ : जिज्ञासा रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम
नागपूर : गणिताप्रमाणेच विज्ञानाचे विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. त्यामुळेच हे विषय समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाची जोड दिली आहे. मात्र शाळेच्या काळात केलेले प्रयोग ऐन परीक्षेच्या वेळी आठवले जात नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ होते. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विज्ञानाच्या प्रयोगांचे मोबाईल अॅप कामी येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगाचे व्हिडिओ या अॅपमध्ये अपलोड केले असून, विद्यार्थी कोणत्याही वेळी या प्रयोगांची उजळणी करू शकतील.
शहरातील जिज्ञासा रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेने हे अॅप्लीकेशन तयार केले आहे. सोसायटीचे अध्यक्ष मनीष करंदीकर यांनी सांगितले की, यू-ट्यूबवर अशाप्रकारे विज्ञानाचे प्रयोग उपलब्ध आहेत. मात्र ते सर्व विदेशातील शाळांमधील असून विद्यार्थ्यांना ते कळायला कठीण आहेत. त्यामुळे येथीलच विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग अपलोड करण्याचा विचार संस्थेने केला. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमातील प्रयोगाचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून ह्यप्रयोग १०ह्ण हे अॅप निर्माण करण्यात आले. यात दहावीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातील १५ प्रयोगांचा समावेश आहे. प्रयोगांच्या व्हिडिओसोबत विद्यार्थ्यांनीच लिहिलेली प्रयोगाची संपूर्ण माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्या परवानगीनंतर हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये अपलोड करून सर्वांसाठी उपलब्ध केल्याचे करंदीकर यांनी सांगितले. गुगल प्ले स्टोअरवर इबीओएम (इलेक्ट्रॉनिक्स ब्राऊचर आॅन मोबाईल) प्रयोग १० असे सर्च केल्यास हे अॅप सहज डाऊनलोड करता येईल. बदलत्या अभ्यासक्रमानुसार नवीन प्रयोग अपडेट करण्याची सोय या अॅपमध्ये असल्याचा दावाही करंदीकर यांनी केला.