गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

By Admin | Published: June 26, 2017 04:10 PM2017-06-26T16:10:26+5:302017-06-26T16:10:26+5:30

इयत्ता दहावीमध्ये गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याबाबत काही तज्ज्ञांनी नकार दर्शविला आहे. गणित हा इतर सर्वच विषयांसाठी

Expert refusal to give mathematical options | गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

googlenewsNext

अविनाश थोरात/ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - इयत्ता दहावीमध्ये गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याबाबत काही तज्ज्ञांनी नकार दर्शविला आहे. गणित हा इतर सर्वच विषयांसाठी आवश्यक असणारा घटक आहे. गणित विषय अवघड वाटण्यामागे अध्यापनातील त्रुटी ही महत्वाची समस्या आहे. त्यामुळे गणिताला पर्याय देण्यापेक्षा अध्यापन पध्दतीत सुधारणा करून गणिताची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. त्यामुळे हे विद्यार्थी या विषयात दहावीत अनुत्तीर्ण होतात. ही गळती रोखण्यासाठी दहावीमध्ये गणित हा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केली आहे. त्यावरून शिक्षण क्षेत्रात तर्कवितर्क लढविले जात आहेत. गणिताला पर्याय म्हणून काही वर्षांपासून सामान्य गणित हा विषय सुरू करण्यात आला होता. पण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढे तंत्रशिक्षणमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तसेच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत गेल्याने आणि काही शाळांकडून विद्यार्थ्यांना हा विषय घेण्यासाठी जबरदस्ती होत असल्याने राज्य शिक्षण मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून हा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा गणिताला पर्याय देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत काही तज्ज्ञांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना गणिताला पर्याय न देण्याची भुमिका मांडली. गणिताला पर्याय देण्यापेक्षा या विषयाची आवक निर्माण होण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, मागील सात वर्षांची गणित विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिल्यास ती सामान्य गणितापेक्षा अधिक दिसते. गणित विषयाचा निकालही वाढत जावून मागील चार वर्ष ८८ ते ९० टक्क्यांमध्ये स्थिर राहिला आहे. तुलनेने सामान्य गणिताचा निकाल आणि विद्यार्थी संख्याही सातत्याने घटत चालल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
शिक्षणमंत्री सकारात्मक?
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही महिन्यांपुर्वी पुण्यात एका कार्यक्रमात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयांना पर्याय देण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या विषयांची त्यांना भीती वाटते. अनुत्तीर्ण झाल्याने अनेकांचे शिक्षण थांबते. त्यामुळे या विषयांना पर्याय देण्याबाबत तज्ज्ञ अभ्यास करतील, असे तावडे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुचनेवर तावडे यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
 
गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याचे तोटेच अधिक आहेत. किमान गणित आयुष्यभर पुरणारे असते. केवळ विज्ञानच नव्हे तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, भुगोल अशा सर्वच विषयांमध्ये गणित आवश्यक असते. दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा निकाल ८८ टक्के असून तो खुप चांगला आहे. केवळ १२ टक्के विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. त्यामुळे गणित विषयात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याचा दावा चुकीचा आहे. गणिताला पर्याय दिल्यास निकाल चांगला लागण्यासाठी काही शाळा विद्यार्थ्यांना पर्यायी विषयासाठी जबरदस्ती करतील. याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक बसेल. पर्याय देण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- वसंत काळपांडे, माजी अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

 
गणित विषय दहावीपर्यंत अनिवार्य असायलाच हवा. गणित ऐच्छिक ठेवणे चुकीचे ठरेल. गणित विषय अवघड वाटण्यामागे विविध कारणे आहेत. अध्यापनामध्ये वैविध्य आणून शिक्षण दिल्यास गणिताबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल. पुर्वी याकडे दुर्लक्ष केले जात होते. आता अनेक अध्यापनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
-संगिता मोहिते, प्राचार्या
 
गणित विषयातील संकल्पना स्पष्ट झाल्यास हा विषय अवघड वाटत नाही. इयत्ता आठवीपर्यंत गणिताचे पायाभुत शिक्षण चांगल्यापध्दतीने मिळणे गरजेचे आहे. हा पाया असून तो पक्का नसल्यास पुढे नववी व दहावीत विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढते. विद्यार्थ्यांची किमान संपादणुक पातळी वाढविण्याचे काम शिक्षकांनी करायला हवे. प्रत्येक विषयामध्ये गणित विषय आवश्यक असतो. गती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषय ऐच्छिक ठेवल्यास त्यांना फायदाच होईल. पण शिक्षकांनी गणित विषय शिकविताना अध्यापनात नाविण्य आणल्यास विद्यार्थ्यांची गोडी वाढून फारसा अवघड वाटणार नाही.
- कैलास साळुंके, अध्यक्ष
पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ  

 

Web Title: Expert refusal to give mathematical options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.