पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश उघड

By admin | Published: June 24, 2017 04:35 AM2017-06-24T04:35:57+5:302017-06-24T04:35:57+5:30

शेतजमिनी मागण्याच्या नावाखाली नेवाळीत झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, या माहितीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ठाम आहेत.

Explain the failure of police detectives | पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश उघड

पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतजमिनी मागण्याच्या नावाखाली नेवाळीत झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, या माहितीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ठाम आहेत. सध्या तरी शंभराहून अधिक आरोपी असल्याचा अंदाज आहे. पोलिसांवर हल्ला चढवणाऱ्या आंदोलकांची गय केली जाणार नाही. पण या पूर्वनियोजित हल्ल्याची पुरेशी माहिती गोळा करण्यात पोलिसांची गुप्तचर शाखा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
नेवाळीच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष अडचणीत आले आहेत. या आंदोलनावेळी पोलिसांवर झालेली दगडफेक, पोलिसांच्या व्हॅनसह अन्य वाहने जाळण्याच्या घटनांमुळे आंदोलक पुरेशा तयारीनिशी आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर वर्षभर शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, परंतु आजवर असा हिंसाचार झाला नसल्याचे पोलीस सांगतात. त्यामुळे हे आंदोलन कोणी पेटवले, याचा शोध सुरू झाला आहे.
गुरुवारच्या हिंसाचाराची पद्धती पाहता, तो पूर्वनियोजित होता असेच दिसते. आंदोलनस्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त होता, परंतु पोलिसांवर वेगवेगळ्या दिशेने दगडफेक होत होती. एका गटाकडे पोलिसांनी मोर्चा वळवला, की दुसऱ्या दिशेने दुसरा गट पोलिसांवर हल्ला चढवायचा. आंदोलनस्थळी रस्त्याचे काम सुरू असल्याने दगडांचा खच पडलेला होता. दगडफेकीसाठी आंदोलकांनी त्याचाच वापर केला. हिंसाचाराची एकूणच पद्धत पाहता, हा हल्ला सुनियोजित असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला होत असतानाही पोलीस उपायुक्त भारद्वाज यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले. त्या वेळची गरज आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी गोळीबारासह सर्वच निर्णय योग्य तऱ्हेने घेतल्याचा दावाही आयुक्तांनी केला.
आंदोलकांनी हिंसाचाराची एवढी तयारी केल्याची पूर्वकल्पना पोलिसांच्या गोपनीय शाखेला यायला हवी होती. त्यामुळे त्याची नक्कीच चौकशी केली जाईल. गोपनीय शाखेला या प्रकरणात मी अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलिसांवर हल्ला केल्यानेच गोळीबार - सिंग
नेवाळीत आंदोलकांना पांगविण्यासाठी आधी लाठीमार करण्यात आला, पण आंदोलक पांगले नाहीत. दगडफेक सुरू राहिली. पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पेलेट गनचा वापर करत गोळीबार करावा लागल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. छर्ऱ्यांच्या बंदुकीच्या वापरात जीव जाण्याची भीती नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहने फोडल्याचा इन्कार
आंदोलनानंतर स्थानिक पोलिसांनी गुरुवारी रात्री नेवाळी भागातील घरांच्या खिडक्या, गाड्या, दुचाकी वाहने, रिक्षांची तोडफोड केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यावरही अशी तोडफोड झाल्याचा त्यांनी इन्कार केला. त्याचवेळी ज्यांनी हिंसक आंदोलन केले, पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांची वाहने जाळली त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नौदलाचा विरोध नसतानाही आंदोलन
नौदलाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध केला नव्हता, तर आपल्या ताब्यात असलेल्या जागेत केवळ भिंत बांधण्यास घेतली होती. त्यामुळे अचानक शेतकऱ्यांनी हिंसक पवित्रा घेण्याचे काहीच कारण नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Explain the failure of police detectives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.