संभाजी भिडेंबाबत भूमिका स्पष्ट करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:33 AM2018-07-10T06:33:57+5:302018-07-10T06:34:10+5:30
छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम यांना गुरू मानत होते. अशा तुकोबांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम यांना गुरू मानत होते. अशा तुकोबांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान, रिपल्बिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे, संत तुकाराम यांचा अपमान कदापिही सहन करणार नसून, मंगळवारपासून राज्यभर मनुस्मृती दहन करणार असल्याचे रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी स्पष्ट केले.
खरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागत शिवसेना सत्तेवर आली आहे. तुकोबांचा अपमान केल्यानंतर सर्व स्तरांतून भिडे यांच्याविरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र, रयतेचे राजे असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना मात्र मूग गिळून गप्प आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे ते मनुस्मृतीचे वाहक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांनी गुरूस्थानी मानलेल्या तुकोबांची तुलना भिडे यांनी थेट मनूशी तुलना केली आहे. हा फक्त संत तुकारामांचा अपमान नसून, सर्व समता, समानता मानणाºया महाराष्ट्राचा अपमान आहे. भिडे यांच्या पाठीमागे संघ परिवाराची व भाजपाची शक्ती आहे, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच ते वाट्टेल तशी वक्तव्ये करीत आहेत, असा आरोपही खरात यांनी केला.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सेनेने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भिडे यांच्याबद्दल काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्याची गरजही रिपाइंने व्यक्त केली.