प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड

By Admin | Published: May 14, 2017 01:06 AM2017-05-14T01:06:26+5:302017-05-14T01:06:26+5:30

तरुणाचा निर्घृण खून करणाऱ्या चौघा आरोपींना २४ तासांच्या आत औरंगाबाद येथून अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.

Explained murdered by love affair | प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड

प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : थेरगाव येथे डांगेचौक ते हिंजवडी रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत तरुणाचा निर्घृण खून करणाऱ्या चौघा आरोपींना २४ तासांच्या आत औरंगाबाद येथून अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांना औरंगाबादहून वाकड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. प्रेम प्रकरणातून श्रीनिवासचा काटा काढण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास महेश पडवळे (वय २२, रा. साईनाथनगर थेरगाव, मूळ. हळदी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर ऊर्फ सोन्या विलास उबाळे (वय १९, रा. थेरगाव) याच्यासह आंबादास सुरेश गायकवाड, सोमनाथ नवनाथ कुंभार, प्रफुल्ल संजय पंडित अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीनिवासच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केले. तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला.
अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मोकळ्या मैदानात पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले, त्यांनी घटनास्थळावर पाहणी केली, ओळख पटू नये, यासाठी मृताचा चेहरा दगडाने ठेचला होता. गळ्यावर शस्त्राच्या जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत श्रीनिवास पडवळे याचे आरोपीच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध होते. ते सागर ऊर्फ सोन्या उबाळे या आरोपीला त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्याने मित्रांच्या मदतीने श्रीनिवासचा काटा काढण्याचा डाव आखला. त्याप्रमाणे गुरुवारी रात्री श्रीनिवासला थेरगाव येथे गाठून मित्रांच्या मदतीने मोकळ्या मैदानात आणले.
त्याच्यावर पहिल्यांदा हत्याराने वार केले. गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून डोके आणि तोंड दगडाने ठेचले. मृतदेह तेथेच सोडून सोन्या उबाळे व आंबादास गायकवाड हे दोघे औरंगाबादला मामाकडे पळून गेले होते.
मृतदेहाच्या हातावर श्रीनिवास असे गोंदले होते. मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी हिंजवडी सांगवी, चतु:शृंगी पोलिसांची मदत घेत तीन पथके आरोपीच्या मागावर पाठवली होती. शुक्रवारी रात्री वाकड पोलिसांनी सोमनाथ आणि प्रफुल्ल या दोघांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने औरंगाबादमधून ताब्यात घेतले.
>नावातील साधर्म्यामुळे दुसऱ्याच सागरची चौकशी
सोन्या ऊर्फ सागर विलास उबाळे असे आरोपीचे नाव वाकड पोलिसांना निष्पन्न होताच पोलिसांच्या तपास पथकाने सागर उबाळेचा कसून शोध सुरू केला. दुपारी तीनच्या सुमारास काळाखडक झोपडपट्टीत नामसाधर्म्य असलेला सागर उबाळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, केवळ नामसाधर्म्य आहे, आरोपी दुसराच कोणीतरी आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागल्याने काळ खडक येथील सागर उबाळेला व त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: Explained murdered by love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.