Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?

By अक्षय शितोळे | Published: November 18, 2024 04:56 PM2024-11-18T16:56:59+5:302024-11-18T16:58:22+5:30

एकीकडे शरद पवार यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि दुसरीकडे महायुतीच्या मातब्बर आमदारांचं आव्हान, अशा स्थितीमुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचली आहे.

Explainer ncp Sharad Pawars meetings became popular in West Maharashtra Will crowds turn into votes | Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?

Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?

Sharad Pawar Speech ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज समारोप होत आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात ऐतिहासिक चित्र पाहायला मिळालं. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे राज्यात यंदा सहा प्रमुख पक्ष मैदानात होते. या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत आपली भूमिका लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील कसलेले खेळाडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या शरद पवार यांच्याही सभांचा धडाका सुरू होता. पवार यांच्या सभांना राज्यातील विविध भागांत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच पवार यांच्या सभांमधील ही गर्दी मतांमध्ये परावर्तित होणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवार यांनी आपलं लक्ष विदर्भ, खानदेश आणि नंतर मराठवाड्यावर केंद्रित केलं होतं. या विभागातील सभा पार पडल्यानंतर पवारांचा मोर्चा वळाला तो बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात. शरद पवार यांच्या सभा पश्चिम महाराष्ट्रात येताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली. कारण पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीतून त्यांच्या सभांना मोठी गर्दी उसळत असल्याचं दिसून आलं.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या शरद पवार यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची जादू दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र पवारांसाठी ही लढाई तितकीशी सोपी नाही. कारण विधानसभा निवडणुकीतील मुद्दे हे लोकसभा निवडणुकीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचं दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या चर्चेमुळे दलित समाज सरकारवर नाराज होता. सत्ताधारी पक्षांतील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये अस्वस्थता होती. मनोज जरांगे फॅक्टरला धार होती आणि कांद्यासह इतर पिकांच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर सत्ताधारी महायुतीने यातील बहुतांशी मुद्द्यांवर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यंदाची निवडणूक स्थानिक समीकरणांवर लढली जात असल्याचं चित्र आहे. अशा स्थितीत राज्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळी आणि आमदार महायुतीच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीसमोरील आव्हान खडतर आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि दुसरीकडे महायुतीच्या मातब्बर आमदारांचं आव्हान, अशा स्थितीमुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचली आहे. या निवडणुकीत कोणाची सरशी होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Explainer ncp Sharad Pawars meetings became popular in West Maharashtra Will crowds turn into votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.