राज्यपाल कोश्यारींकडून अमित शहांना स्पष्टीकरण; शिवरायांच्या अवमानावर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:22 AM2022-12-13T07:22:50+5:302022-12-13T07:23:13+5:30
औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वादळ उठले असून, त्यावरून कोश्यारी हटावची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणत्याही पद्धतीने अवमान करण्याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. तथापि, आपल्या भाषणातील संदर्भ तोडून आपल्यावर टीका केली गेली, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वादळ उठले असून, त्यावरून कोश्यारी हटावची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत आणि उदाहरणेही देत असत. हे सारे आदर्श आहेतच. मात्र, तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अलीकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असे विधान मी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो; पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषयच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही. - भगतसिंह कोश्यारी