जीएसटीच्या बैठकीला मोहन जोशीच गैरहजर, विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:26 AM2017-10-12T03:26:20+5:302017-10-12T03:26:43+5:30
‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली.
मुंबई : ‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. मात्र, निमंत्रण देऊनही मोहन जोशी या बैठकीला आले नाहीत, असे सांगत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, साहित्य परिषद, नाट्यनिर्माता महासंघ आदी सांस्कृतिक क्षेत्रातील मातृसंस्थांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत, विनोद तावडे यांना लक्ष्य केले होते. सांस्कृतिक क्षेत्राबाबत सरकारमध्ये कमालीची उदासीनता आहे. तावडे यांच्याकडे अन्य खात्यांचा भार असल्याने या खात्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मोहन जोशींनी केला होता.
या सर्व प्रश्नांना तावडे यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून उत्तर दिले. आतापर्यंतच्या कोणत्याही सांस्कृतिकमंत्र्याच्या एका कार्यकालात एवढे उपक्रम झाले नाहीत. तरीही मोहन जोशी आणि अन्यमंडळींनी केलेली वक्तव्ये साहित्य व संस्कृतीच्या हितासाठी केली असावीत, असे समजून मी संबधितांना भेटून या सर्व विषयांमध्ये कार्यवाही सुरू करतो, अशी भूमिका तावडे यांनी आपल्या निवेदनात मांडली.
मोहन जोशी यांनी आपल्याकडे वेळ मागितली आणि आपण त्यांना दिली नाही असे कधीही झाले नाही. जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही, अशी कोपरखळीही तावडे यांनी मारली आहे.
अलिबाग येथे झालेल्या मराठी नाट्य स्पर्धांच्या पुरस्कार कार्यक्रमाला जोरदार पावसामुळे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे जाता आले नाही, असे काही अपवाद वगळता आपण स्वत: प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे असा खुलासाही तावडे यांनी केला आहे.