भाजपात जाणार नाही, राधकृष्ण विखे-पाटलांचं स्पष्टीकरण
By admin | Published: July 10, 2017 07:49 PM2017-07-10T19:49:21+5:302017-07-10T21:52:20+5:30
आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांतून आलेले वृत्त चुकीचे असून काँग्रेसच माझा पक्ष आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतोय
Next
ऑनलाइन लोकमत
शिर्डी(धुळे), दि. 10 - आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांतून आलेले वृत्त चुकीचे असून काँग्रेसच माझा पक्ष आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतोय, असे स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत दिले.
नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या शिर्डी दौऱ्यात विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठात आले. शिवाय त्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनेही उधळली. त्यामुळे आगामी राजकारणात विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यावर विखे यांनी सोमवारी शिर्डीत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
विखे पुढे म्हणाले की, भाजपात जाणार यात कोणतेही तथ्य नाही. केवळ आपल्या मतदारसंघात कार्यक्रम असल्याने एकाच व्यासपीठावर आलो. आम्ही मैत्री केली म्हणून वेगळी भूमिका घेतली नाही. आमची राजकारणविरहीत मैत्री आहे. विरोधी पक्षनेता म्हणून आजवर केलेल्या कामामुळे समाधानी असून, पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतोय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.