२१९ कोटींचा हवाला व्यवहार उघड

By admin | Published: March 17, 2016 01:17 AM2016-03-17T01:17:35+5:302016-03-17T01:17:35+5:30

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहाराच्या करण्यात आलेल्या चौकशीत तब्बल २१९ कोटी रुपयांचा छगन भुजबळ यांनी हवाला व्यवहार केला व हे पैसे त्यांनी संपत्ती जमा करण्यासाठी लाच

Explanation of Rs. 219 crores | २१९ कोटींचा हवाला व्यवहार उघड

२१९ कोटींचा हवाला व्यवहार उघड

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहाराच्या करण्यात आलेल्या चौकशीत तब्बल २१९ कोटी रुपयांचा छगन भुजबळ यांनी हवाला व्यवहार केला व हे पैसे त्यांनी संपत्ती जमा करण्यासाठी लाच म्हणून घेतल्याचे उघड झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी भुजबळांची त्यांच्या कंपन्यांच्या किमान तीन बनावट संचालकांसमोर बुधवारी चौकशी केली. हे कर्मचारी लाचेचा पैसा जमा करण्यासाठी स्थापन केलेल्या कंपन्यांचे संचालक बनविण्यात आलेले होते. सध्या छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे तुरुंगात आहेत. समीर भुजबळ यांना छगन भुजबळ यांच्या समोर गुरुवारी हजर करण्यासाठी त्यांचा ताबा मिळावा, असा अर्ज ईडीने न्यायालयाकडे केला आहे. छगन भुजबळ यांचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरे देऊन असहकार्य सुरूच आहे.
‘या गैरव्यवहारामध्ये २१९ कोटी रुपयांचा (तोही बहुतेक रोख स्वरूपात) हवाला व्यवहार झाला. ही रोख रक्कम हवाला आॅपरेटर्सच्या माध्यमातून गेली, लाच म्हणून घेतलेले धनादेश (चेक्स) मुद्दाम स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले.’ असे विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग असलेल्या सूत्रांनी सांगितले.
ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) तीन कर्मचाऱ्यांना भुजबळांसमोर आणण्यात आले होते. समीर आणि पंकज भुजबळ यांनी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांचे या कर्मचाऱ्यांना संचालक बनविण्यात आले होते. छगन भुजबळांसमोर एमईटीचा माजी कर्मचारी अमित बिराज याला उपस्थित करण्यात आले होते. हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट सुरू करण्यास खारघरमध्ये जागा विकत घेण्यासाठी देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा वळविण्यात आला होता. याच देवीशाचा बिराज याला संचालक बनविण्यात आले होते. नवव्या मजल्यावर असलेल्या एमईटीच्या कार्यालयात भुजबळ यांनी एक हजार किमतीच्या नोटा स्वीकारल्या व त्यांची मोजणी करण्यासाठी यंत्र वापरावे लागले होते. या कार्यालयाच्या व्यवहारांचे खरे रूप बिराज याने या वेळी दाखविले. संजय जोशी आणि तनवीर शेख या अन्य कर्मचाऱ्यांनाही भुजबळ यांच्या समोर हजर करण्यात आले होते. जोशी आणि शेख यांनाही बनावट संचालक बनविण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना एकमेकांसमोर उभे केले जाणार आहे. त्यासाठी त्याचा ताबा मिळावा असा अर्ज आम्ही न्यायालयाकडे केला आहे.
याच कारणांवरून आम्ही समीर भुजबळची कोठडी वाढवून मागणार आहोत. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समोरासमोर आणल्यानंतर विचारले जाणारे प्रश्न आम्ही तयार केले आहेत, असे सूत्र म्हणाले. छगन भुजबळांची ईडीची कोठडी गुरुवारी संपत असल्यामुळे त्यांना त्याच दिवशी न्यायालयात हजर केले जाईल.

भुजबळ समाजसेवक
पैशांचा स्रोत आणि नेमके व्यवहार याबद्दल विचारले असता आपली त्यात काही भूमिका नाही, असे भुजबळ म्हणाले. मी कसा समाजसेवक आहे, महोत्सवांमध्ये प्रसिद्ध लोक हजेरी लावत असलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे कसे आयोजन करतो, असे सांगून प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे व्हिडीओ दाखविण्याची तयारी त्यांनी दाखविली. कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांनी भुजबळांच्या फाउंडेशन ट्रस्टला पैसे दिले होते. या ट्रस्टचा तपशील पाठवायला सांगितल्यावर भुजबळांनी ध्वनिचित्रफीत पाठवून दिली होती. त्यामध्ये भुजबळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील होता व त्यात सेलिना जेटली, नेहा धुपिया, लारा दत्ता अशा कलावंतांनी कार्यक्रम सादर केल्याचे दिसले.

जोखीम घ्यायची नव्हती
दीर्घावधीसाठी कोठडी न मागता ईडीने न्यायालयाकडे भुजबळ यांच्या चौकशीसाठी फक्त तीन दिवसांचीच कोठडी का मागितली, यावरून भुवया उंचावल्या जात आहेत. यावर खुलासा करताना सूत्रांनी सांगितले की, भुजबळ सोबत औषधांचे खोके घेऊन आले होते. तसेच त्यांचे उतारवय पाहता आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. त्यांच्या प्रकृतीचा विचार करूनच आम्ही दीर्घ कालावधीची कोठडी मागितली नाही.

जेवण मागविले
छगन भुजबळ यांच्या निकवर्तीय सूूत्रांनी सांगितले की, ईडीकडून भुजबळ यांना चांगली वागणूक देण्यात येत आहे. ईडीची कॅन्टीन नसल्याने जवळच्या रेस्टॉरन्टमधून भुजबळ यांच्यासाठी जेवणही मागवण्यात आले.

कर्मचाऱ्यांवरच आरोप
भुजबळ यांच्या माजी कर्मचाऱ्यांना त्यांच्या समोर हजर केले असता या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त कागदोपत्री संचालक होण्यास सांगितल्याची कबुली दिली. तथापि, भुजबळ यांनी त्यांच्यावर असा दोषारोप केला की, कटकारस्थान रचून हे लोक माझ्यावर कुभांड रचत आहेत.

Web Title: Explanation of Rs. 219 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.