दोघा पोलिसांकडून तरुणीचे शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 01:23 AM2017-02-27T01:23:13+5:302017-02-27T01:23:13+5:30
तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत, तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली
जमीर काझी,
मुंबई- दोघा पोलीस कॉन्स्टेबलनी एका तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत, तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. एकाने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर मारहाण करून गर्भपात केला. त्यानंतर, सहकाऱ्याच्या मदतीने याबाबत वाच्यता न करण्यासाठी धमकावले़ आता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करीत, भोईवाडा पोलिसांकडून आपल्यावर खोटी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.
कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे व संतोष कदम अशी त्यांची नावे आहेत. तिऊरवडे हा पोलीस सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांच्या कार्यालयात तर कदम हा कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे ‘आॅर्डली’ म्हणून कार्यरत आहे. दोघांपासून पीडित असलेली तरुणी धनश्री (बदललेले नाव)ने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही न झाल्याचे तिने सांगितले.
धनश्री मुंबई महापालिकेच्या एका रुग्णालयात कार्यरत आहे. कल्याण येथे राहात असलेल्या नेताजी नावाच्या तरुणाबरोबर काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. अडीच वर्षांपासून तो काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्याने अन्य एका तरुणीबरोबर विवाह केल्याचे समजल्यानंतर, धनश्री याबाबत गेल्या वर्षी मे महिन्यात पोलीस आयुक्तालयात तक्रार करण्यास गेली़तेव्हा कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडेशी तिचा परिचय झाला. माझी खूप ओळख असून, न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने त्याने तिच्याशी संपर्क प्रस्थापित केला. धनश्रीच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाकडे गेले. त्यानंतर, कॉन्स्टेबल तिऊरवडेने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती राहिल्याने तिने लग्नाचा आग्रह धरला.मात्र, तो टाळाटाळ करू लागला. डिसेंबर महिन्यात त्यांच्यात भांडण झाले़ त्याने केलेल्या मारहाणीत तिचा गर्भपात झाला. धनश्री ऐकत नसल्याने त्याने ही बाब भोईवाडा पोलीस कॉलनीतील कॉन्स्टेबल मित्र संतोष कदमला सांगितली. त्याने धनश्रीला चर्चा करून तोडगा काढण्याचे सांगत भेटण्यास बोलाविले. ती भेटण्यास आली असता, आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत, कोणी पोलीस तुझी तक्रार घेणार नाही, हा विषय सोडून दे, असे त्याने धमकावले. धनश्रीने भोईवाड्यातील कदमच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. त्याच दिवशी तुषारने रात्री साडेआठ वाजता फोन करून तुला भेटायचे असून, नायर हॉस्पिटलजवळ थांबण्यास सांगितले. त्यानुसार ती थांबली़ थोड्या वेळात तेथे पोलीस येऊन व्हॅनमध्ये बसवून तिला भोईवाडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
या प्रकाराने घाबरलेल्या धनश्रीने आपण काय गुन्हा केला, अशी विचारणा केली. तेव्हा तेथील महिला उपनिरीक्षक देशमुख यांनी तुम्ही तिऊरवडे यांच्या घरी जाऊन घरातल्या मंडळींशी भांडल्याची तक्रार असल्याचे सांगितले. धनश्रीने मैत्रिणीला फोन करून टीव्ही चॅनेलवाल्यांना सोबत आणण्यास सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी तिची समजूत काढण्याच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढले़ धनश्रीने १३ फेबु्रवारीला पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना दिलेल्या अर्जामध्ये हा सर्व प्रकार नमूद केला आहे.
‘तरुणीचा अर्ज संबंधितांकडे पाठवला’
सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी तरुणीला संबंधित पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याची सूचना
केल्याचे सांगितले. तर आयजी प्रशांत बुरडे यांनी हा प्रकार मुंबई परिमंडळ-४च्या अखत्यारित येत असल्याने, तरुणीचा अर्ज संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठविल्याचे सांगितले. मात्र, कॉन्स्टेबल कदम हा आपल्या नावाचा व कार्यालयाच्या गैरवापर करीत असल्याच्या तरुणीच्या आरोपाबाबत भाष्य करण्यास नकार दिला.
पीडितेच्या आरोपाबाबत कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फोन कट केला. तर कॉन्स्टेबल संतोष कदम याने फोन उचलला नाही.