मुलींचे शोषण सुरूच

By admin | Published: October 20, 2016 01:33 AM2016-10-20T01:33:21+5:302016-10-20T01:33:21+5:30

शारीरिक, मानसिक शोषण कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली

Exploitation of girls | मुलींचे शोषण सुरूच

मुलींचे शोषण सुरूच

Next


शिरूर : येथील शासकीय मुलींचे वरिष्ठ बालगृहात मुलींचे शारीरिक व मानसिक शोषण होत असून त्याला जबाबदार महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांवर बाल संरक्षण, बालकांना हक्काचे शिक्षण व बालहक्कासह शारीरिक, मानसिक शोषण कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. यावर पोलीस निरीक्षक गावडे यांनी चौकशीसाठी तक्रारअर्ज महिला व बाल कल्याण विभागाकडे पाठविला असून, दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना अवगतही केले आहे. राज्यातील एकमेव बालगृह महिला व बाल कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.
ज्या बालगृहातील मुली दोन वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, बालगृहात १३ मुली आहेत. हे बालगृह सध्या काळजीवाहक चालवीत आहेत. वर्ग-२च्या अधीक्षिका तर नाहीतच, ज्यांच्याकडे पदभार सोपावलाय त्यादेखील बालगृहाकडे फिरकत नाहीत. गृहमाता, परिचारिका यादेखील बालगृहात येत नाहीत. बालगृहात वीज नाही. या सुविधांच्या अभावाखेरीज मुलींच्या भोजनाची प्रचंड हेळसांड सध्या सुरू आहे.
कित्येक दिवसांपासून दररोज जेवणात डाळभात दिला जात आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून दूध दिले जात नाही.
दहावीच्या चार मुलींची तर चक्क उपासमार सुरू आहे. उर्वरित मुलींना शाळेत पोषण आहार मिळत असल्याने त्या यातून सुटल्या आहेत. आपल्या तक्रारीत पाचंगे यांनी या सर्व बाबींबरोबरच मुलींना आरोग्याच्या सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांना कपडे दिले गेले नाहीत, स्वयंपाक, धुणीभांडी, झाडलोट ही कामे जबरदस्तीने मुलींकडून करून घेणे, शासनाच्या अनुदानाचा मुलींना लाभ न देता त्यांची उपासमार करून त्यांना सकस आाहारापासून वंचित ठेवणे आदी मुद्द्यांचा उल्लेख केला असून, त्याकडे वारंवार लक्ष वेधूनही महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे या मुलीचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी बालसंरक्षण हक्कांचा विविध कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार पाचंगे यांनी दाखल केली आहे. (वार्ताहर)
>...तर बेमुदत उपोषण करणार
या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक गावडे यांनी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मीनाक्षी बिराजदार यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही. यानंतर गावडे यांनी आज महिला व बाल कल्याण विभागाचे उपायुक्त रवींद्र पाटील, विभागीय उपायुक्त शिर्के आदिंशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून बालगृहातील तक्रारीविषयी कल्पना दिली.
पाचंगे यांनी महिला व बाल कल्याण विभागाचा प्रभारी पदभार असलेल्या सिंघल
यांच्याशी संपर्क साधला असता, प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगितले. मात्र, सोमवारपर्यंत या मुलींच्या शोषणासंदर्भात गुन्हा दाखल न झाल्यास
मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
>अपंगाला डांबून ठेवले
बालगृहात अनेक महिन्यांपासून एक अपंग (दहावीत शिकणाऱ्या) मुलीला शाळेत न पाठवता बालगृहातच डांबून ठेवून तिच्याकडून स्वयंपाक व इतर कामे करून घेतली जात असल्याच्या धक्कादायक प्रकाराचीही पाचंगे यांच्या तक्रारीत नोंद आहे.

Web Title: Exploitation of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.