साखर कारखान्यात स्फोट
By admin | Published: April 7, 2016 02:22 AM2016-04-07T02:22:31+5:302016-04-07T02:22:31+5:30
येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील स्फोटात मळीची टाकी (मोलॅसेस टँक) फुटून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले.
लोणी (जि. अहमदनगर) : येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील स्फोटात मळीची टाकी (मोलॅसेस टँक) फुटून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. टँकला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला.
मळीची टाकी गळायला लागल्याने ती दुरुस्त करण्याचे काम कारखान्यातील केमिस्ट, वेल्डर आणि इतर कामगार हाती घेणार होते. त्याची पाहणी करीत असतानाच टाकीत स्फोट झाला. घटनास्थळावरील कामगार दूर फेकले गेले. त्यात विनोद दादा जोंधळे ( ६०, रा. निमगाव जाळी), बाळू संपत देवरे (५६, रा. लोणी, दोघेही केमिस्ट) तर सहायक शशिकांत पगारे (५२, रा. लोणी) यांचा मृत्यू झाला. इतर ९ कामगार जखमी झाले. जखमींना तातडीने प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी विजय हरिभाऊ चेचरे, शेख शकील अजीम यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी रुग्णालयात धाव घेतली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही तातडीने लोणीकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)
> जखमींची नावे
रामदास चिमा पवार, मोहन जिजाबा वदक, राजेश मकासरे, नवनाथ अण्णासाहेब विखे, निलेश चांगदेव धावणे, संदीप काशीनाथ देवकर, दामोधर माधव घाडगे हे कामगार दुर्घटनेत जखमी झाले. त्यांना मदत करताना इतर सहा जण किरकोळ जखमी झाले.