तळवडेतील कंपनीत टाकीचा स्फोट, सुदैवाने जिवीत हानी टळली
By admin | Published: September 7, 2016 03:04 PM2016-09-07T15:04:50+5:302016-09-07T15:04:50+5:30
तळवडे ज्योतिबानगर येथील त्रिमुर्ती इंजिनिअरिंग एंटरप्रायजेस या कंपनीत लोखंडी टाकी साफ करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे टाकीचा स्फोट झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
तळवडे (कोल्हापूर), दि. ७ - तळवडे ज्योतिबानगर येथील त्रिमुर्ती इंजिनिअरिंग एंटरप्रायजेस या कंपनीत लोखंडी टाकी साफ करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे टाकीचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने कंपनीतील कामगार तसेच तळवडे एमआयडीसी परिसरातील कामगारांची धावपळ उडाली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाऊण तासाच्या अथक परिश्रमाने आग विझवली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
कंपनीत मोठ्या आकारातील लोखंडी टाकी साफसफाईकरिता आणली होती. लोखंडी टाकीत डांबर असल्याने ते काढण्यासाठी कामगारांनी वेगवेगळे प्रयोग केले. टाकी साफ करण्यासाठी लोखंडी टाकीच्या सर्व बाजुंनी आग लावण्याची शक्कल त्यांनी लढवली. लोखंडी टाकीतील डांबराने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ पसरले. औद्योगिक परिसरात सर्वत्र धूर पसरला. कंपनीच्या आवारात तर एकाचवेळी धूर,आगीच्या ज्वाळा आणि जळालेल्या डांबराचा वास पसरला. लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या कंपनीमुळे परिसरातील रहिवाशीसुद्धा भयभीत झाले. तळवडेतील कंपनीत आग नियंत्रणाची कोणतीच यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाचे बंब वेळीच पोहोचले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.
तळवडे औद्येगिक परिसरात काही रासायनिक कारखानेही आहेत. तसेच पेट्रोलपंप, मोठ्या कंपन्यांच्या अत्यंत ज्वालाग्राही अशा हायड्रोक्लोरिक अॅसिडच्या मोठ्या टाक्याही आहेत. त्यामुळे अशा घटना मोठ्या दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरू नयेत. यासाठी दक्षतेच्या योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी अशा कंपन्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आठ वर्षापुर्वी भोसरीतील साई इंडस्ट्रिजमध्ये झालेल्या स्फोटात दहा महिला कर्मचारी होरपाळल्या होत्या. या दुर्घटनेनंतरही औद्योगिक क्षेत्रात याबाबत दक्षता घेतली जात नसल्याचा प्रत्यय आला.