स्फोटांनी हादरले पुलगाव, ‘सुरक्षा व्यवस्था कालबाह्य’
By admin | Published: June 1, 2016 04:08 AM2016-06-01T04:08:26+5:302016-06-01T04:08:26+5:30
देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडार हे देशातील सर्वात मोठे व आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे दारुगोळा भांडार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या भाषेत याला पुलगाव
योगेश पांडे, नागपूर
देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडार हे देशातील सर्वात मोठे व आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे दारुगोळा भांडार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या भाषेत याला पुलगाव ‘कॅड’ (सेंट्रल अम्युनेशन डेपो) असे म्हटल्या जाते. पुलगाव ‘कॅड’चे वैशिष्ट्य म्हणजे येथून देशातील सर्व भागात दारुगोळ््याचा पुरवठा करण्यात येतो.
संरक्षण विभागाला सातत्याने दारुगोळ्याची आवश्यकता भासत असते. यात बंदुकीच्या गोळ््या, बॉम्ब, मिसाईल, लॅन्डमाईन्स इत्यादींचा समावेश असतो. दारुगोळा व्यवस्थापनाला सैन्यदलात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दारुगोळा निर्मितीपासून ते प्रत्यक्ष ते सैन्यदलाला सुपूर्द करण्यापर्यंत विविध प्रक्रिया असतात. एकाच ठिकाणी दारुगोळा तयार होत नाहीत. विविध नऊ प्राधिकरणांकडे वेगवेगळ््या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. यात ‘जीएस’ शाखा (जनरल स्टाफ), एमजीओ (मास्टर जनरल आॅफ आॅर्डनन्स), ‘एपीजी’ (एम्युनेशन प्लॅनिंग ग्रुप), ‘डीजीओएस’ (डायरेक्टर जनरल आॅर्डनन्स सर्व्हिसेस), ‘ओएफबी’ (आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्ड), ‘डीजीक्यूए’ (डायरेक्टर जनरल क्वॉलिटी अॅशुरन्स), संरक्षण मंत्रालय, ‘कॅड’ पुलगाव व ‘एडी’ (अॅम्युनेशन डेपो) यांचा समावेश आहे. प्रत्येक प्राधिकरणाची स्वतंत्र जबाबदारी असली तर एकमेकांशी सगळे जुळलेले आहेत. पुलगाव येथील ‘कॅड’ची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे देशभरात दारुगोळ््याचा पुरवठा करणे. देशातील विविध आयुध निर्माणी कारखाने, व्यापारी केंद्र इत्यादी ठिकाणांहून येथे दारुगोळा येतो. हा एकत्र आलेला दारुगोळा देशातील विविध दारुगोळा आगारांमध्ये आवश्यकतेनुसार पाठविण्यात येतो.
‘त्यांच्या’ बलिदानामुळे वाचले अनेकांचे प्राण
वर्धा : त्या १६ जणांनी बलिदान दिल्यामुळे शेकडो जणांचे जीव वाचले. अन्यथा सीएडी कॅम्पमधील सात बंकर (ज्यात प्रचंड क्षमतेचा दारूगोळा होता) ते जळाले असते, तर भयंकर दुर्घटना घडली असती, असे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे म्हटले.
सोमवारी मध्यरात्रीनंतर केंद्रीय दारुगोळा भांडारात आग लागून भीषण बॉम्बस्फोट झाला. त्यात अधिकाऱ्यांसह १६ जण शहीद झाले अन् १६ जण गंभीर जखमी झाले. त्यांची भेट घेण्यासाठी संरक्षण मंत्री पर्रिकर यांनी मंगळवारी दुपारी पुलगावच्या दारूगोळा भांडाराला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात भरती असलेल्या जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत खा. रामदास तडस, सेनादल प्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह, दारूगोळा भांडाराचे ब्रिगेडियर संजय शेट्टी तसेच अन्य विभागाचे शिर्षस्थ अधिकारी होते.
जखमींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दारूगोळा भांडारातील परिसरात असलेले गवत जळाले. ते विझविण्यासाठी अधिकारी आणि जवान पोहोचले. आग विझविणे सुरू असतानाच भीषण स्फोट झाला. यामध्ये १६ जवान शहीद झाले. आगीपासून काही अंतरावर सात बंकर होते. त्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते बंकर आगीपासून बचावले. ते बंकर जळाले असते तर अनेक स्फोट झाले असते आणि भयावह दुर्घटना घडली असती. प्राणाची आहुती देऊन त्या सर्वांनी शेकडो जणांचे जीव वाचविले.
या प्रकरणात घातपाताचा संशय नाही, असेही पर्रिकर यांनी यावेळी स्पष्ट केले.या घटनेची चौकशी दोन दिवसात पूर्ण करून तसा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्फोटामुळे परिसरातील गावांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. त्या सर्व नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
(कार्यालय प्रतिनिधी)
जखमींच्या भेटीसाठी तगमग
रुपेश खैरी, वर्धा
अनेकांचा बळी घेणारा बॉम्बस्फोट झाला. भीषण आगीमुळे अनेकांना जीवघेण्या जखमा झाल्या. आपला माणूस या स्फोटाच्या वेळी आगीशी झूंजत होता. तो गंभीर आहे. रुग्णालयात आहे. मात्र, त्याच्यासोबत बोलायलाच काय त्याला बघायचीही परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे जखमींच्या नातेवाईकांची तगमग वाढली होती. अनेकांच्या विशेषत: पीडित परिवारातील महिला अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. अनेकांच्या भावनांचा बांध फुटण्याच्या तयारीत होता. अस्वस्थ करणारे हे चित्र होते, सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील!
सोमवारी मध्यरात्रीनंतर पुलगाव येथील दारूगोळा भांडार परिसरात आग लागल्याने भीषण बॉम्बस्फोट होऊन १७ अधिकारी, जवान शहिद झाले. या स्फोटात १९ जणांना गंभीर दुखापत झाली. बहुतांश जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींची नावे कळताच त्यांना बघण्यासाठी नातलंगांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र येथे त्याना आत जाऊ देण्यास सुरक्षा रक्षक मनाई करीत होते. तासभर, दीड तास, दोन तास आणि तीन तास झाले. सकाळचे ९.३० वाजले तरी आपल्या जखमी नातेवाईकाची प्रकृती कशी आहे, तो कोणत्या अवस्थेत आहे, ते जाणून घेण्यासाठी आलेल्यांना रोखून ठेवण्यात आले होते. डॉक्टर, रुग्णालय प्रशासनही परवानगी द्यायला तयार नसल्याने जखमींच्या नातेवाईकांचा विशेषत: महिला मंडळींच्या भावनांचा बांध फुटण्याच्या वाटेवर होता. पुरूष मंडळींनी हमरातुमरी करून आपला रोष व्यक्त करणे सुरू केले होते. परिणामी एका वेगळळ्याच वातावरणाची अनुभूती रुग्णालयाच्या आवारात येत होती. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने अखेर एकेकाला आतमध्ये भेट घेण्याची परवानगी दिली. रडत भेकतच अनेक जण आतमध्ये गेले.
बोलायचे सूचतच नव्हते. केवळ मूक संवाद आणि अश्रूच्या धारा होत्या.मृत्यूशी झूंजताना बघून अनेकांच्या आप्तांच्या भावना गलबलून येत होत्या. त्यामुळे कुणी आवाज देण्याच्या पूर्वीच अनेक जण जखमी आप्ताला मूक निरोप देत होते. महिला डोळळ्याच्या धारा पुसत, तोंडात पदराचा बोळा कोंबून भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करीत होत्या. सारेच निशब्द होते. मात्र, सर्वांच्याच चेह-यांची स्थिती बोलकी होती.
मनोजकुमारच्या रुपातील ‘आपला माणूस’ शहीद
पराग मगर/धीरज ठावरे/रोशन घुडे, वर्धा
बॉम्बचा हादरा अन् आगीचे लोळ हजारो ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवीत होते. जानमालाची धाकधूक असतानाच काय झाले, कसे झाले, हे जाणून घेण्याचीही प्रत्येकालाच उत्सुकता होती. त्यामुळे आपला माणूस वाटणाऱ्या मेजर मनोजकुमारांना अनेक गावातील नागरिक फोन करीत होते. त्यांचा फोन नो-रिप्लॉय होता. सोमवारची मध्यरात्र गडद होत होती. मंगळवारची पहाट अस्वस्थ करणारी होती अन् सकाळ मन सुन्न करणारी ठरली. अनेक गावांतील शेकडो ग्रामस्थांचा जिवाभावाचा मित्र म्हणून ओळखले जाणारे मेजर मनोजकुमार यांना दारूगोळा भांडारातील दुर्घटनेत वीरमरण आले होते. ही घटना अनेकांना चटका लावणारी ठरली.
पुलगावचे दारूगोळा भांडार म्हणजे अतिसुरक्षित अन् प्रतिबंधित परिसर. सर्वसामान्यांना आतमध्ये जायला मुभा नाही. तेथील बहुतांश अधिकारीही फटकून वागतात. प्रशासनाकडून सुरक्षेचा बागुलबुवा केला जात असल्याने सर्वसामान्यांना प्रशासनातील अधिकारी तर सोडा, तर सीएडी कॅम्पच्या आजूबाजूला फटकायला मिळत
नाही.
अशात एक अधिकारी गावकऱ्यांशी माणुसकीचे नाते जोडतो. गावकऱ्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेत असल्यामुळे आणि कोणत्याही वेळी सहजपणे उपलब्ध होत असल्याने बी. मनोजकमार नावाचे मेजर शेकडो ग्रामस्थांना आपले वाटतात. त्यांचे लाघवी बोलणे, आपुलकीने समस्या ऐकून घेणे, हवी ती माहिती देणे एक वेगळे नाते जोडणारे ठरते. त्याचमुळे सोमवारी मध्यरात्री सीएडी कॅम्प परिसरात स्फोट आणि आगीचे लोळ उठल्याने आजूबाजूच्या गावातील शेकडो ग्रामस्थांनी काय झाले, कसे झाले ते जाणून घेण्यासाठी मनोजकुमार यांच्या संपर्क क्रमांकावर फोन लावणे सुरू केले. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. वेगवेगळ्या बातम्या येत असल्याने गावकऱ्यांची रात्र गडद होत होती. पहाटही अस्वस्थ झाली अन् भल्या सकाळी मनोजकुमार अब नही रहें...! ही वार्ता धडकली. त्याच क्षणापासून संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली.
‘सुरक्षा व्यवस्था कालबाह्य’
राकेश घानोडे, नागपूर
पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारमधील सुरक्षा व्यवस्था कालबाह्य झाल्याचा दावा सेवानिवृत्त सेना अधिकारी कर्नल गुरुंग यांनी केला.
हे दारुगोळा भांडार इंग्रजांनी तयार केले असून ते प्रथम व द्वितीय महायुद्धाच्या काळात या ठिकाणी दारुगोळा साठवून ठेवत होते. हा परिसर देशाच्या मध्यभागी आहे. यामुळे कोणताही शत्रू हे भांडार सहजतेने नष्ट करू शकत नाही. भांडारातील सुरक्षा व्यवस्थाही त्या काळात होती तशीच कायम आहे. प्रत्येक शासनाने ‘चलता है चलने दो’ अशीच भूमिका या भांडाराबाबत घेतली आहे. भांडाराच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. अत्यंत घातक स्वरुपाचा दारुगोळा जमिनीखाली साठवला गेला पाहिजे. हे फार खर्चिक काम आहे. यामुळे शासन याकडे लक्ष देत नसावे असे कर्नल गुरुंग यांनी सांगितले. पुलगावातील भांडारात गटानुसार दारुगोळा साठवला जातो. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असते. काही दारुगोळ्यांना साधी हवाही सहन होत नाही. हवेशी संपर्क आल्यास आग पेटून त्यांचा स्फोट होतो. काही दारुगोळ्यांची आग पाणी टाकून विझविता येते तर, काही दारुगोळ्यांची आग विझविण्यासाठी पाण्याचा वापरच करता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन सुरक्षेचे आधुनिक उपाय करणे आवश्यक आहे असे मत कर्नल गुरुंग यांनी व्यक्त केले. पुलगाव दारुगोळा भांडाराचा परिसर प्रचंड विस्तीर्ण आणि टेकड्या व झाडांनी व्यापलेला आहे.
घातपात?
1पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारमध्ये घातपात झाला असण्याची शक्यता सेवानिवृत्त सेना अधिकारी कर्नल सुनील देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
2दारुगोळा भांडारमध्ये आग लागू नये यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. भांडारासह बाहेरच्या परिसरात गवत व झाडेझुडपे वाढू दिली जात नाही. परिसर स्वच्छ ठेवला जातो. आगीवर नियंत्रण मिळविण्याची यंत्रणा सदैव सज्ज असते. त्यासाठी वेळोवेळी प्रात्यक्षिक केले जाते.
3पुलगाव येथे देशातील सर्वात मोठे व आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे दारुगोळा भांडार आहे. या भांडारात देशभरातील आॅर्डनन्स फॅक्टऱ्यांमध्ये तयार होणारा दारुगोळा एकत्र केला जातो व येथून हा दारुगोळा आवश्यक तेथे वितरित केला जातो. यामुळे येथील आग नियंत्रण यंत्रणा प्रभावहीन असण्याचे काहीच कारण नाही.
4भांडारात रात्री १ वाजता आग लागल्याचे वृत्त आहे. ही वेळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार घातक असते. या काळात माणसाला गाढ झोप लागते. परिणामी भांडारात घातपात केला गेला असावा असा दाट संशय येतो. एवढ्या रात्री बाहेरची व्यक्ती भांडार परिसरात शिरू शकत नाही. यामुळे यासाठी आतलीच व्यक्ती कारणीभूत असू शकते. सखोल चौकशीनंतर यातील सत्य बाहेर येईल असे कर्नल देशपांडे यांनी सांगितले.
5पुलगाव दारुगोळा भांडारमध्ये तोफा, बंदुका इत्यादीमध्ये वापरावयाच्या स्फोटक शेलचा साठा केला जातो. शेल लोखंडाचा असतो व त्यात बारुद भरलेली असते. स्फोट झाल्यानंतर शेलचे लोखंडी तुकडे अत्यंत वेगात अस्ताव्यस्त उडतात. हे तुकडे माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर मृत्यू होतो. आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळेच मृत्यू झाला असू शकतो असा अंदाज कर्नल देशपांडे यांनी व्यक्त केला.
6देशातील दारुगोळा भांडार व आॅर्डनन्स फॅक्टऱ्यांमध्ये आतापर्यंत अनेक दुर्घटना झाल्या. पण, पुलगाव येथील घटना सर्वात मोठी आहे असे मत कर्नल देशपांडे यांनी व्यक्त केले.
मान्यवरांच्या सहवेदना
पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात घडलेल्या स्फोटात जवानांचा मृत्यू झाल्याचे ऐकून अतीव दुख झाले. या जवानांच्या मृत्यूने देशाचे मोठे नुकसान झाले असून ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, अशी माझी प्रार्थना आहे. असे जखमी जवानांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
- हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती
केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मी प्रचंड दु:खी झालो आहे. या जवानांच्या निधनामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही मी दिल्या आहेत. जखमींना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने नजीकच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकरच सुधारणा होवो, अशी मी कामना करतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेली आग दुर्दैवी आहे. या आगीत सैन्याचे अधिकारी, जवान व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावे लागले. यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगात सगळे देशवासी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना.
-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक
व जहाजबांधणी मंत्री
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेत १६ जणांचा बळी गेला. मृतांचे नातेवाईक, जखमी आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री