राज्यातून १५ टन संत्र्यांची दुबईला निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 07:36 PM2020-02-15T19:36:11+5:302020-02-15T19:41:08+5:30
राज्यामध्ये अमरावती आणि नागपुर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन
पुणे : अॅग्रीकल्चरल अॅण्ड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) आणि कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातून तब्बल साडेपंधरा टन संत्र्याची दुबई येथे निर्यात करण्यात आली. प्रथमच वॅक्सींगची प्रक्रिया करुन संत्र्यांची निर्यात करण्यात आली असून, तब्बल चाळीस टन कंटेनर निर्यातीचे नियोजन असल्याची माहिती पणन मंडळाने दिली.
अमरावती जिल्ह्यातील साडेपंधरा टन संत्री एस.डी.एफ. प्रोडकशन प्रा. लि. कंपनी मार्फत पाठविण्यात आली. कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील पॅक हाऊस मध्ये संत्र्याची प्रथम प्रतवारी करण्यात आली. संत्रा पाण्याने स्वच्छ करुन त्यावर वॅक्सींग करुन निर्यात करण्यात आली आहेत. राज्यामध्ये अमरावती आणि नागपुर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन होते. संत्र्याच्या निर्यातीमधील अडचणी लक्षात घेऊन पणन मंडळाने संत्रा वॅक्सींग करुन निर्यात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रथमच संत्र्याची वॅक्सींग करुन निर्यात करण्यात आली आहे. तसेच यावेळी संत्रा बॉक्स पॅकींग न करता प्रथमच १० किलोच्या क्रेट्स मध्ये संत्री ठेवून, कंटेनरने निर्यात केली आहेत. कंटेनर १९ फेब्रुवारी रोजी दुबई येथे पोहचेल.
निर्यातीची प्रक्रिया कृषी पणन मंडळ आणि अपेडा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित निर्यात यशस्वी झाल्यास या हंगामात सुमारे ४० कंटेनर निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी पणन मंडळाने दिली. दुबई येथील आयातदार अल्ताफ हुसेन आणि रियास आणि निर्यातदार सोनल लोहारीकर, अपेडाचे सहायक सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटिल, हॉर्टीकलचर डेव्हलपमेंट ऑफिसर अभिमन्यू माने, कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ जंगम तुषार, नितीन मेरे, संजय गुरव यावेळी उपस्थित होते.
-----------