अतिरिक्त गुणांवर आक्षेप
By admin | Published: June 6, 2016 03:12 AM2016-06-06T03:12:07+5:302016-06-06T03:12:07+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना खेळाडू, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह इतर काहींना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाने
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना खेळाडू, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह इतर काहींना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाने आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने या गुणांची मागणी लावून धरल्याने यावर्षी हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. मात्र, इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असे अतिरिक्त गुण ग्राह्य धरले जात नसल्याचे कारण पुढे करून पुढील एक-दोन वर्षात वैद्यकीयची सवलतही रद्द होण्याची शक्यता आहे. मागील २० वर्षांपासून केवळ वैद्यकीयसाठीच हे अतिरिक्त गुण का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. एमएचटी-सीईटीचा निकालानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त गुणांसाठी माहिती भरण्याचे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले. खेळ, एनसीसी विद्यार्थी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र सैनिकांच्या मुलांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत. सीईटीमध्ये मिळालेले गुण व अतिरिक्त गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. मागील २० वर्षांपासून हे अतिरिक्त गुण दिले जात आहेत. यावर्षी मात्र या अतिरिक्त गुणांवर राज्याच्या विधी व न्याय विभागाने आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)